Pune Ganpati bappa पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचा वाद अखेर मिटला आहे. मानाचे गणपती सकाळी ९.३० वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतील. विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांकडून ढोल-ताशा पथकं कमी केली जाणार आहेत.
सर्व गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची सहकार्याची भूमिका बैठकीत व्यक्त केली.
पुण्यात गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत बैठक झाली. पुण्यातील सर्किट हाऊसवर बैठक संपन्न झाली. मानाचे गणपती मंडळांचे प्रतिनिधी आणि इतर गणेश मंडळांच्या प्रतिनिधी यांच्यातील वाद शमणार असून बैठकीत मुरलीधर मोहोळ यांच्यासह आमदार हेमंत रासने यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
विसर्जन मिरवणुकीच्या वेळेबाबत “मानाचे विरुद्ध कामाचे” असा वाद गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा हा वाद सोडवण्यासाठी मोहोळ आणि रासने यांच्यावर जबाबदारी दिलेली होती. मागील गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गणेशोत्सवाच्याबाबत विविध चर्चा शहरात सगळीकडे रंगल्या होत्या. गणेशोत्सवाच्या उत्सवाबाबत तसेच विसर्जन मिरवणुकीच्या संदर्भात गणेश मंडळातील वाद देखील समोर आले.
आढावा बैठक ग्रामीण पोलीस मुख्यालयात घेण्यात आली. लोणावळा, खेड, जुन्नर आणि शिरूर उपविभागातील १८ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण १२८ गणेश मंडळांचे अध्यक्ष तसेच पोलीस पाटील या बैठकीला उपस्थित होते. गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षिततेत पार पाडण्यासाठी पोलिस व मंडळांमध्ये समन्वय साधणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं अधोरेखित करण्यात आलं.
गणेशोत्सव हा सांस्कृतिक एकतेचा आणि भक्तीभावाचा उत्सव असून, पोलिसांच्या या सूचनांमुळे यंदाचा उत्सव अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात पार पडेल, अशी अपेक्षा आहे.
