महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (ता.२१) माध्यमांशी संवाद साधताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं. ते म्हणाले, महायुती सरकारच्या निवडणूक संकल्पनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतल्यास त्याचा फायदा खऱ्या गरजवंत शेतकऱ्यांऐवजी श्रीमंत आणि बड्या लोकांना होण्याची भीती आहे. कर्जमाफीचा लाभ फक्त खऱ्या गरजवंत, गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांनाच मिळावा हे त्यांनी नमूद केल.
बावनकुळे यांनी सांगितलं की, यापूर्वीच्या कर्जमाफी योजनांमध्ये अनेकदा असं दिसून आलं आहे की, ज्यांना कर्जमाफीची गरज नाही, असे लोकही या योजनेचा लाभ घेतात. उदाहरणार्थ, ज्यांनी फार्महाऊस, मोठे बंगले किंवा इतर सुखसोयींसाठी कर्ज घेतलं आहे ते फेडण्यासाठी, अशा श्रीमंत व्यक्तींनी शेतकरी कर्जमाफीचा गैरफायदा घेतला आहे.Farmer Loan Waiver: लोकसभेत केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिली थकीत कर्जाची माहिती
यामुळे खरे गरीब आणि छोटे शेतकरी, विशेषतः अल्पभूधारक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले शेतकरी, या योजनांच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. ही बाब सरकारच्या लक्षात आली असून, यावर तोडगा काढण्यासाठी ठोस पावलं उचलली जात आहेत.या समस्येचं निराकरण करण्यासाठी महायुती सरकारने एक विशेष समिती स्थापन केली आहे.
ही समिती प्रत्येक शेतकऱ्याच्या आर्थिक परिस्थितीचा सखोल अभ्यास करेल आणि कोणाला खरोखर कर्जमाफीची गरज आहे, याची पडताळणी करेल. बावनकुळे यांनी माध्यमांना आवाहन केलं की, या समितीचा अहवाल आल्यानंतर सर्वांनी तो काळजीपूर्वक वाचावा. हा अहवाल प्रत्येक शेतकऱ्याच्या घराची तपासणी करून तयार केला जाईल, ज्यामुळे कर्जमाफीचा लाभ योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचेल.
यासाठी सरकार सविस्तर सर्वेक्षण करणार आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचा बारकाईने विचार केला जाईल.बावनकुळे यांनी पुढे नमूद केलं की, सरसकट कर्जमाफीमुळे गेल्या काही योजनांमध्ये धनदांडग्यांचाच फायदा झाला आहे, तर खऱ्या गरजवंत शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही.
सरकार अतिशय काळजीपूर्वक पावलं उचलत आहे, जेणेकरून कर्जमाफीचा लाभ फक्त अल्पभूधारक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत शेतकऱ्यांनाच मिळेल. या योजनेचा मुख्य उद्देश आहे की, शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, त्यांचं जीवनमान सुधारावं आणि त्यांना कर्जाच्या ओझ्यापासून मुक्ती मिळावी. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कर्जमाफीची योजना जाहीर केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
