२०२६ मध्ये नवे महापौर महानगरपालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा;

Pune news २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने या सर्व २९ महापालिकांची प्रारूप प्रभाग रचना तयार करून ती राज्य निवडणूक आयोगाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवली आहे.

यामुळे, गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुका लवकरच पार पडणार हे निश्चित झाले आहे.

निवडणुकीची तयारी वेगात

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाचा आणि प्रभाग रचनेचा तिढा सुटल्यानंतर सरकारने निवडणुकांच्या तयारीला गती दिली आहे. निवडणूक आयोगाकडून प्रारूप प्रभाग रचना लवकरच जाहीर केली जाईल. त्यानंतर नागरिकांकडून त्यावर हरकती आणि सूचना मागवल्या जातील. लोकांच्या सूचनांचा विचार करून अंतिम प्रभाग रचना निश्चित केली जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, २५ ऑगस्टपूर्वी कोणत्याही क्षणी ही प्रारूप प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता आहे. यानंतर, सप्टेंबरमध्ये अंतिम प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

२०२६ मध्ये नवे महापौर

प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर लगेचच प्रभागांमधील आरक्षणाची सोडत काढली जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकांचा बिगुल वाजेल. सध्याच्या अंदाजानुसार, डिसेंबर २०२५ पर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण होऊन जानेवारी २०२६ मध्ये या २९ महानगरपालिकांमध्ये नवे महापौर विराजमान होण्याची शक्यता आहे.