पुणे महापालिका सतर्क; नदीकाठच्या वस्त्यांना पुराचा फटका

Pune news खडकवासला प्रकल्प आणि पवन धरण, मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुळा-मुठा नदीत ८५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने पुणे शहरात पूरस्थिती निर्माण झाली.

एकतानगरी, पुलाची वाडी, खिलारेवाडी, तपोधाम, मंगळवार पेठ, पाटील इस्टेट, येरवड्यातील शांतिनगर, ताडीवाला रस्ता यासह अन्य भागात पाणी शिरल्याने तेथील ४०४ कुटुंबातील १ हजार ४९८ नागरिकांना पुणे महापालिकेने सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले.

महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील पथक व आपत्ती व्यवस्थापन विभाग पूरस्थिती हाताळण्यासाठी सज्ज असल्याने कोणतेही नुकसान झाले नाही.

गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरासह खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव, मुळशी, पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. पुण्यातील पाऊस दुपारपासून थांबलेला असला तरी घाटमाथ्यावर पावसाचा जोर आहे. त्यामुळे मुळा-मुठा नदीमध्ये येणारा पाण्याचा प्रवाह कमी करण्यात आलेला नाही. आज दिवसभर खडकवासला धरणातून ३९ हजार १३८ क्यूसेक पाणी मुठा नदीत सोडले जात होते. पवना धरणातून १५ हजार क्यूसेक आणि मुळशी धरणातून ३१ हजार क्यूसेक पाणी सोडले जात होते. त्यामुळे पुणे शहरातील मुळा-मुठा या दोन्ही नद्यांना पूर आल्याने नदी काठच्या वस्त्यांना त्याचा फटका बसला.