बाबासाहेब सरोदे यांची आत्महत्या म्हणजे सरकारच्या खोट्या आश्वासनामुळे – विकास लवांडे

maharashtra News – स्व. बाबासाहेब सुभाष सरोदे रा. देडगाव ता. नेवासा, जि. अहिल्यानगर या तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली.

मृत्यूपूर्वी केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत कर्जमाफीच्या खोट्या आश्वासनांचा निषेध केला आहे. तो व्हिडिओ पाहिला तर प्रत्येकाचं मन हेलवणारी आणि संताप जनक अशी घटना आहे.

सरकार कर्जमाफी करेल, दिलेला शब्द पाळेल असा त्यांना विश्वास होता. पण फडणवीस सरकारने जनतेला दिलेला शब्द पाळला नाही. दुष्काळ, अतिवृष्टी, शेतमालाला भाव नाही, पिकं हातातून निसटली आणि कर्जाचं ओझं वाढत गेलं. या सगळ्याला कंटाळून त्यांनी अखेर स्वतःचा जीव संपवला.

आज संपूर्ण महाराष्ट्रात ओल्या दुष्काळाचं सावट आहे. रोजच्या रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. हाताशी आलेला घास निसटतो आहे, जुन्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी नवीन कर्जाच्या खाईत ढकलला जात आहे. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बहिरे बनून बसले आहेत. निवडणुकीच्या वेळी मोठमोठी आश्वासने देणं, आणि सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळ करणं हा क्रूर दृष्टिकोन महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा सर्वात मोठा अपमान आहे.

फडणवीस साहेब, शेतकरी हिंदू नाहीत का? हिंदुत्वाचा कळवळा फक्त राजकारणापुरता आहे का? अजून किती शेतकऱ्यांचे प्राण तुम्ही हिरावून घेणार आहात?स्व. बाबासाहेब सरोदे यांच्या मृत्यूला केवळ आत्महत्या म्हणता येणार नाही, तर तो शासनाच्या खोट्या आश्वासनामुळे घडलेला थेट मनुष्यवध आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ राजीनामे द्यावेत.

मेहरबान हायकोर्टाने सुमोटो दखल घेऊन या प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत. स्व. बाबासाहेब सरोदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. खरी श्रद्धांजली तेव्हाच ठरेल जेव्हा शेतकरी कर्जमुक्त होतील आणि महाराष्ट्रातील आत्महत्या थांबतील