Pune Update दोन दिवसांपासून शहरात संततधार पाऊस सुरू आहे. मंगळवारी सकाळी पावसाचा जोर आणखी वाढला. अशा वेळी कामानिमित्त बाहेर पडणारे प्रवासी ॲपवर रिक्षा बुक करत होते, पण त्यांना बराच वेळ वेटिंगवर राहावे लागले.
तसेच ज्यांना रिक्षा मिळाल्या त्यांना जादा भाडे द्यावे लागले. रिक्षाचालकांच्या या मनमानी कारभारामुळे पुणेकर प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला.
नेहमी रिक्षाचालक प्रवाशांच्या शोधत फिरत असतात. परंतु पावसाच्या वेळी वाहनांची मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने रिक्षाचालक त्याचा गैरफायदा घेतात. तसेच अशावेळी रिक्षा, कॅबचालकांकडून ॲप बंद करून ठेवण्यात येते. शिवाय ज्याचे ॲप सुरू असते, ते लवकर प्रवासी घेत नाहीत. त्यांना सारखे वेटिंगवर ठेवले जाते. त्यांनतर भाडे स्वीकारले जाते. परंतु भाडे दीड ते दोन पट अधिक आकारले जाते.
इतर वेळी रिक्षाचालकांकडून प्रवासी खेचण्याची तीव्र स्पर्धा सुरू असते. परंतु पाऊस असल्यावर रिक्षाचालकांकडून मोबाइल ॲपवर दर्शवलेले दर आकारण्याऐवजी जादा भाडे आकारण्याचे धोरण अवलंबिले जाते. तसेच प्रवासी अनेकदा रिक्षा बुक करताना ॲपवर दाखवलेल्या दरांनुसार रिक्षा बुक करण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु अशा वेळी रिक्षाचालक त्यांच्याजवळ आल्यानंतर अथवा फोन करून रिक्षाची सेवा ही मीटरनुसार असल्याचे सांगतो. त्यावेळी प्रवासी त्याला ॲपनुसार भाडे आकारण्याचा आग्रह धरतात; परंतु रिक्षाचालक ते नाकारतात. त्यामुळे नाइलाजाने प्रवाशांना जास्तीचे भाडे देऊन प्रवास करावा लागतो.
