Hinjewadi News: हिंजवडी आयटी हबमधील रस्ते अतिक्रमण, वाहतूक कोंडीने ग्रासले होते. परिणामी आयटीयन्सना तासन्तास कोंडीत अडकून पडावे लागत होते. दरम्यान, गेल्या दीड महिन्यात प्रमुख तीन चौकालगतची अतिक्रमणे हटवल्यानंतर या चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे.
चौकालगतची जवळपास बाराशेहून अधिक अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली आहेत; तसेच दहा रस्त्यांचे सर्व्हेक्षण सुरू आहे.
आयटी पार्कमधील नागरी समस्या, वाहतूक कोंडी यामुळे येथील कंपन्या त्रासल्या होत्या. नवीन कंपन्यांनी निराशा व्यक्त केली होती. तर, कंपन्यांनी स्थलांतर करण्याचा विचार सुरू होता. याची दखल घेत खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीत दोनवेळा समस्यांचा आढावा घेतला. या वेळी पीएमआरडीए, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ यासह स्थानिक ग्रामपंचायत यांनादेखील सूचना केल्या होत्या. तसेच, सिंगल पॉईंट ऑथरिटीचे तयार करण्यात आली असून, पुणे विभागाचे विभागीय आयुक्त हे अध्यक्ष आहेत. त्यानुसार सर्वच विभाग कामाला लागेल होते.
दीप्ती सूर्यवंशी पाटील, सहआयुक्त, पीएमआरडीएहिंजवडी, मारुंजी परिसरात रस्ते प्रस्तावित आहेत. त्या अनुषंगाने सर्व्हेक्षण, सुनावणी कारवाई सुरु आहे. या ठिकाणी रस्त्यावर अडथळे येणारे व कोंडीच्या कारणांची पाहणी करण्यात आली होती. त्यानुसार अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे चौकातील वाहतूक कोंडी कमी झाली आहे.
