Pune Flyover : पुण्यातील दोन उड्डाणपुलाचे उद्‍घाटन लांबणीवर

पुणे सिंहगड रस्त्यावरून स्वारगेटकडे जाण्यासाठी शिवा काशीद चौक ते हिंगणे या दरम्यानचा उड्डाणपुलाचे अंतिम टप्प्यातील काम शिल्लक असल्याने १५ ऑगस्ट रोजीच्या उद्‍घाटनाचा कार्यक्रम लांबणीवर पडला आहे.

फटका आणि राजभवन ते इ स्क्वेअर या दरम्यानच्या उड्डाणपुलाच्या उद्‍घाटनाला बसला आहे. हे दोन्ही उड्डाणपूल सुरु होण्यास आणखी किमान १० दिवस लागणार आहेत.

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने ११८ कोटी रुपये खर्च करून तीन उड्डाणपूल बांधण्याचे काम २०२२ मध्ये सुरु केले. त्यातील दोन उड्डाणपुलांचे काम पूर्ण होऊन त्यांचे लोकार्पण झाले आहे. आता उड्डाणपुलाच्या तिसऱ्या टप्पा पूर्णत्वास जात आहे.

सुमारे ४० कोटी रुपये खर्च करून माणिकबागेतील काशीद चौक ते हिंगणे येथील पेट्रोलपंपापर्यंत हा उड्डाणपूल बांधला आहे. माणिकबागेतील रॅम्पचे काम पूर्ण झाले असून, डांबरीकरण ही झाले आहे. तर हिंगणेच्या बाजूच्या रॅम्पचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे.

पण या रॅम्पच्या कठड्याचे, पथ दिव्यांचे आणि रंगकाम शिल्लक आहे. हे काम १५ ऑगस्ट पूर्वी पूर्ण होऊ शकणार नाही. त्यास किमान १० दिवस लागणार आहेत. दरम्यान ठेकेदाराला १५ ऑगस्टची अंतिम मुदत देण्यात आली होती, पण हे काम वेळेत पूर्ण न झाल्याने नागरिकांना अजून काही दिवस उद्‍घाटनाची वाट पाहावी लागणार आहे.

डावीकडे वळू नये म्हणून उपाययोजना

हिंगणे येथे हा उड्डाणपूल पेट्रोल पंपाच्या दारात उतरतो. त्यामुळे उड्डाणपुलावरून येणारे वाहनचालक पंपावर जाण्यासाठी डावीकडे वळू शकतात त्यामुळे भविष्यात कोंडी तर होईलच, पण अपघात होण्याची शक्यता आहे हे ‘सकाळ’ने निदर्शनास आणून दिले होते.

त्यानंतर प्रशासनाने रॅम्पचा कठड्याची लांबी वाढवून हे वाहने पेट्रोल पंपाकडे वळू शकणार नाहीत यासाठी सुधारणा केली आहे. तसेच हिंगणे चौक ते पेट्रोल पंप यादरम्यानचा रस्ता दुरुस्त करणे, अतिक्रमण काढणे, बस थांब्याच्या शेजारचे अडथळे दूर करणे आवश्‍यक आहे.

‘सिंहगड रस्त्याच्या उड्डाणपुलाच्या कामाची मी पाहणी केली आहे. त्याचे काही काम शिल्लक आहे त्यामुळे १५ ऑगस्टला त्याचे उद्‍घाटन होऊ शकणार नाही. सिंहगड रस्ता आणि विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल यांचे एकावेळी उद्‍घाटन होईल.’

– नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका