नागरिक आणि व्यावसायिकांनी इच्छेने दिलेली वर्गणी मंडळांनी स्वीकारावी. वर्गणीसाठी जबरदस्ती केल्यास संबंधित मंडळांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिला.
सुरक्षेसाठी जिल्ह्यातील सर्व मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. यातील किमान एक कॅमेरा आपल्या परिसरात कायमस्वरूपी ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. यामुळे जिल्ह्यावर किमान साडेआठ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहील.
जिल्ह्यात साडेआठ हजार गणेश मंडळे आहेत. या सर्व मंडळांना स्थानिक पोलिस ठाण्यात नोंदणी करणे आणि विविध प्रकारच्या परवानग्या घेणे बंधनकारक केले आहे. वर्गणी गोळा करायची असल्यास धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करावी लागले. काही मंडळांकडून जबरदस्तीने वर्गणी वसूल केली जाते. याचा त्रास नागरिक आणि व्यावसायिकांना सहन करावा लागतो.
यातून काही वादाचेही प्रसंग उद्भवतात. असे प्रकार रोखण्यासाठी मंडळांनी वर्गणीसाठी कोणावरही जबरदस्ती करू नये, असे आवाहन केले आहे. याबाबत तक्रारी आल्यास संबंधित मंडळांवर थेट खंडणीचे गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही अधीक्षक योगेश कुमार यांनी दिला आहे.
