Thane Mahapalika Bharti 2025: ठाणे महानगरपालिकेत मेगाभरती

hane Municipal Corporation Recruitment 2025: सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. कारण ठाणे महानगरपालिका आस्थापनेवरील गट-क व गट-ड मधील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

जाहिरातीमधील पदे प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, निमवैद्यकोष सेवा, इत्यादी सेवेमधील आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावेत असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ठाणे महानगरपालिकेने काढलेल्या जाहिरातीनुसार गट-क व गट-ड मधील एकूण १७७३ पदांकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याचा कालावधी १२ ऑगस्ट २०२५ ते ०२ सप्टेंबर २०२५ पर्यंत आहे. जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी ठाणे महानगरपालिकेच्या www.thanecity.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ०२ सप्टेंबर २०२५ रोजी २३:५९ वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत.

अमागास प्रवर्गासाठी रुपये 1000एवढे प्रवेश शुल्क आहे. तर, मागासप्रवर्ग आणि अनाथ प्रवर्गासाठी 900रुपये एवढे परीक्षा शुल्क आहे. माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी शुल्क माफ आहे. अर्ज व परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पध्दतीनेच भरणे आवश्यक आहे. उमेदवारास प्रसिध्द केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरीता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करुन त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील. परीक्षा शुल्क ना-परतावा आहे. ऑनलाईन शुल्क भरताना बँकेचे इतर शुल्क उमेदवाराला स्वत: भरावे लागेल. कोणत्याही कारणास्तव पदभरती प्रक्रिया स्थगित / रद्द झाल्यास उमेदवारास परीक्षा शुल्क परत करण्यात येणार नाही.

ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क 02 सप्टेंबर,2025 पर्यंत भरता येईल. तसेच, परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र परीक्षेच्या सात दिवसआधी उपलब्ध होईल. प्रवेश पत्रात ऑनलाईन परीक्षेचा दिनांक नमूद करण्यात येईल. ही माहिती ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात येईल. परीक्षेचा दिनांक, वेळ, केंद्र इत्यादी बाबी प्रवेशपत्रामध्ये नमूद केल्या जाणार आहेत. तसेच, या भरतीच्या कार्यक्रमातील संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती प्रसिध्द करण्यात येणार आहे.