पुणे- अहिल्यानगर या ९८ किलोमीटरच्या दुहेरी रेल्वेमार्गासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. या प्रस्तावित रेल्वेमार्गामुळे या दोन्ही शहरांतील प्रवासाचा कालावधी अवघ्या दीड तासावर येऊन ठेपेल.
पण, नव्या मार्गामुळे बहुचर्चित नाशिक- पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प बासनात गुंडाळला गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
केंद्रातर्फे नुकताच नागपूर- इटारसी चौथ्या रेल्वेमार्गाला तसेच छत्रपती संभाजीनगर ते परभणी दुहेरीकरणास ‘हिरवा कंदील’ दाखविण्यात आला आहे. पुढच्या टप्प्यात आता पुणे ते अहिल्यानगर हा थेट ९८ किलोमीटरचा रेल्वेमार्ग प्रस्तावित करण्यात आला. मध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे त्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूनेच दुहेरी रेल्वेरूळ अंथरले जाणार आहेत.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. कंपनीने त्यासाठीचा भूमी सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल (डीपीआर) तयार केला. हा प्रस्तावित रेल्वेमार्ग चार वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, या मार्गामुळे पुणे ते अहिल्यानगर अंतर अवघ्या दीड तासात कापता येईल. त्यामुळे नगरवासीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मात्र, त्याबरोबरच नाशिककरांच्या अपेक्षांना सुरुंग लागेल. नाशिक ते पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाची पाच वर्षांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. तब्बल २१२ किलोमीटरच्या या मार्गावर ताशी १६० किलोमीटर वेगाने रेल्वे धावतील, असा दावा केला जातो. परंतु, मार्गातील रेल्वेपूल, बोगदे व अन्य तांत्रिक बाबींमुळे हा मार्ग रखडला आहे.
मध्यंतरी विधानसभा निवडणुकांच्या काळात नाशिक- सिन्नर- शिर्डी- अहिल्यानगरमार्गे- पुणे असा मार्ग उभारण्याचा मुद्दा पुढे आहे; परंतु या नव्या मार्गाला विरोध झाल्यावर रेल्वे मंत्रालयाकडून हा प्रकल्प काहीसा मागे पडला. दरम्यानच्या काळात मध्य रेल्वेच्या पुणे विभागामार्फत पुणे ते अहिल्यानगर असा सेमी हायस्पीड प्रकल्प उभारण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. परिणामी, नाशिककरांच्या सेमी हायस्पीड रेल्वेच्या अपेक्षांवर पाणी फेरले जाऊ शकते.
