Balewadi Traffic बालेवाडीतील एसकेपी कॅम्पस परिसरातील स्थिती, वाहतूक कोंडीत भर ; वाहनचालकांची कसरत

Share

Balewadi एसकेपी कॅम्पसजवळच्या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक रहिवाशांसह वाहनचालकांनी केली आहे.

बालेवाडी येथील एसकेपी कॅम्पस जवळचा रस्ता हा बालेवाडी गाव, बालेवाडी हाय स्ट्रीटला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. त्याचबरोबर मुंबई-बंगळूर महामार्गाकडे जाण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर याच रस्त्याचा वापर करतात. सध्या याच भागात हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोचे काम सुरू असून मेट्रोच्या पिलरमुळे रस्ता अरुंद झाला आहे.

तसेच एसकेपी जवळचा एका बाजूचा रस्ता खराब असल्याने नागरिक तो रस्ता अजिबात वापरत नाहीत. ये-जा करण्यासाठी रस्त्याच्या एकाच बाजूचा वापर करत असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. त्याच बरोबर या ठिकाणी जवळ तीन शाळा आहेत. तिथे मुलांना सोडवायला आणि पुन्हा घ्यायला येणारे पालक रस्त्यावर सुद्धा वाहने उभी करून शाळेत जातात. आदी कारणांमुळे वाहतूक कोंडी होते.

पावसाच्या दिवसांत पाणी साचून रस्त्यावर पाण्याचे तळे तयार होते. सध्या येथे खडी टाकली आहे. परंतु तरीही रस्ता वापरता येत नाही. या ठिकाणी सर्रास वाहने उभी केलेली असतात त्यामुळे वाहतूक कोंडीत अजूनच भर पडते. तरी हा रस्ता ताबडतोब दुरुस्त करून घेण्याची मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.

हा रस्ता आधीच अरुंद त्यात मेट्रोच्या कामामुळे निर्माण झालेले मोठाले खड्डे, मेट्रोसाठी लागणारे सामान घेऊन येणारी अवजड वाहने यात वाहतुकीचा वेग मंदावतो आणि वाहतूक कोंडी होते. या सततच्या कोंडीमुळे या भागातील नागरिक मेटाकुटीला आले आहेत. तरी प्रशासनाने या भागातील रस्त्यांवर पडलेले खड्डे तसेच एसकेपी कॅम्पस समोरचा रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *