बालेवाडी प्रतिनिधी (Mahadev temple) हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व असून शुक्रवार, 25 जुलैपासून हा महिना सुरू झाला आहे. या महिन्यात भगवान शंकराची उपासना, जलाभिषेक, दुग्धाभिषेक आणि रुद्राभिषेकाला विशेष महत्त्व असून, शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याची प्राचीन परंपरा आहे.
बालेवाडीतील बालेश्वर मंदिर येथे पहिला सोमवार असून आज पहाटे चारवाजेपासून बाणेर बालेवाडीतील नागरिकांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली.
हर हर महादेवचा गजर करत शिवमंदिरात आज सकाळी सात वाजल्यापासून अनेक भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले असून अभिषेकही केले जात आहेत.
श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवाची आराधना केली जाते. यंदा चार श्रावणी सोमवार असून, ज्यामध्ये शिवमूठ वाहता येणार आहे. श्रावणात नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, पोळा यांसारखे सण उत्साहात साजरे केले जातात. हिंदू धर्मातील पवित्र महिना असल्यामुळे श्रावणातील प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे. पृथ्वीने नवीन हिरवा गालीचा ओढण्याचा काळ म्हणजे श्रावणात हिंदू संस्कृती, परंपरा, सण उत्सवाची अगदी भक्तीभावपूर्वक रेलचेल असते.