IT पार्क बंगळुरू-हैद्राबाद चाललंय… अजितदादा भल्या पहाटे ६ वाजता हिंजवडीत, सरपंचांना झापलं

Share

पुणे प्रतिनिधी (IT park) अजित पवार यांनी आज पहाटे 6 वाजता हिंजवडी आयटी पार्क, माण आणि मारुंजी परिसराचा आकस्मिक दौरा करत विकासकामांचा आढावा घेतला. अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, वाहतूक कोंडी आणि पाणी साचण्याच्या समस्यांमुळे हिंजवडी परिसराची बदनामी होत असल्याचा संताप व्यक्त करत त्यांनी सरपंच आणि विकासकांना खडसावलं.

आयटी पार्क बंगळुरू-हैदराबादला जात आहे, पण इथल्या समस्यांमुळे पुण्याची बदनामी होतेय. मी का पहाटे सहा वाजता फिरतोय?” असा सवाल करत अजित पवारांनी प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश दिले.

सरपंचांना खडसावलं

अजित पवारांनी सरपंचांना सुनावलं, “आपलं वाटोळं झालंय! आयटी पार्क बंगळुरू-हैदराबादला जात आहे. पण इथलं आयटी पार्क पुण्यातून, महाराष्ट्रातून बाहेर जाण्याची वेळ येतेय. तुम्हाला याचं काहीच पडलं नाही का? मी पहाटे सहा वाजता येथे का फिरतोय?”

हिंजवडी येथील विकास कामांची देखील त्यांनी पाहणी केली, मात्र, यावेळी त्यांना रस्त्यासाठी आवश्यक असणारं भूसंपादन झालं नसल्याचं लक्षात आलं. यावरूनच त्यांनी स्थानिक सरपंच गणेश जांभूळकर यांना खडेबोल सुनावत काम लवकरात लवकर करा असे सांगितले. हा सगळा प्रकार कॅमेरात कैद झाला असून, अजित पवार यावेळी चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले.

जांभूळकर यांनी यावेळी अजित पवारांना सांगितले की, ‘रस्त्याचं भूसंपादन करत असताना काही अतिक्रमणं काढता येणार नाहीत, अशी स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांची भूमिका होती. तसेच रस्त्यात असणारं धार्मिक स्थळ काढता येणार नाही. असंही ते म्हणाले. यावरूनच अजित पवार चांगलेच संतापले.

अजित म्हणाले, ‘अहो, असू द्या… धरणं बांधताना मंदिरं पाण्यात जातातच की नाही.’ जांभूळकरांनी आपली भूमिका ऐकून घ्यावी, असं सांगितलं असता, अजित पवार म्हणाले, ‘तुम्हाला जे सांगायचं ते सांगा, मी ऐकून घेतो. पण मी काय करायचं ते मी करतो. आपलं वाटोळं झालंय. हिंजवडी आयटी पार्क बँगलोर, हैदराबादला जात आहे, पण कुणाला काहीच पडलं नाही.’ अजित पवार आणि जांभूळकर यांचं हे संभाषण प्रसार माध्यमांनी कॅमेरात रेकॉर्ड केलं. यावरही अजित पवार संतापले आणि “ये कॅमेरा बंद कर” असं सांगत आपला राग व्यक्त केला.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *