पुणे :: आशिया खंडातील सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या व राजकीय खेळीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी प्रकाश चंद्रकांत जगताप यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाली.
मावळते सभापती दिलीप दादा काळभोर यांनी सभापती पदाचा राजीनामा दिल्याने बाजार समितीच्या सभागृहात आज शुक्रवारी (ता.18) निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणूक प्रक्रियेत सभापती पदासाठी प्रकाश जगताप यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे पुणे (उत्तर) जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद व दौंडचे आमदार राहुल कुल या दोघांनी प्रमुख भूमिका बजावल्याचे समजत आहे.
यावेळी माजी सभापती दिलीप काळभोर, उपसभापती दत्तात्रय पायगुडे, संचालक रोहिदास उंद्रे, रामकृष्ण सातव, राजाराम कांचन, संतोष आबासाहेब कांचन, सुदर्शन चौधरी, शशिकांत गायकवाड, प्रशांत काळभोर, नितीन दांगट, गणेश घुले, रवींद्र कंद, मनिषा हरपळे, सारिका हरगुडे, आबासाहेब आबनावे, गणेश घुले व अनिरुध्द भोसले, संतोष नांगरे यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांनी नुकताच सभापतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर तालुक्यातून सभापतीपदासाठी कोणाची वर्णी लागणार म्हणून हवेली तालुक्यातून चर्चेचा धुराळा उडाला होता. अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यापर्यंत हे पद मिळावे म्हणून तालुक्यातील नेत्यांची धावपळ सुरू होती. मात्र अखेर संचालक मंडळातील विद्यमान 12 संचालकांनी प्रकाश जगताप यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना सभापती करण्याचा मार्ग मोकळा केला. आज शुक्रवारी सभापतीपदासाठी केवळ प्रकाश जगताप यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे.