पुणे प्रतिनिधी :: भेकराईनगर, फुरसुंगी, उरुळी देवाचीसह परिसरात महावितरण कंपनीने बसविलेल्या टी. ओ. डी. स्मार्ट वीजमीटरमुळे सातपट वाढीव वीजबिले आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ही बिले कमी करून मिळावीत आणि स्मार्ट मीटर बसविणे तत्काळ थांबवावे, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
याबाबत कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक गणेश ढोरे यांनी दिला आहे.
ढोरे म्हणाले की, परिसरात स्मार्ट मीटर बसविण्याअगोदर ज्यांना 700 ते 1500 वीज बिल येत होते, त्यांना आता 7 हजार ते 14 हजार बिल येत आहे. ज्यांचा पगारच 10 ते 15 हजार आहे, त्यांनी वीज बिल भरून कुंटुबाच्या उदानिर्वाहाचा खर्च कसा करायचा, काय खायचे आणि मुलांना शाळा कशी शिकवायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महावितरणने ग्राहकांची बिले तातडीने कमी करून द्यावी आणि स्मार्ट मीटर बसविणे थांबवावे, यासाठी नागरिकांच्या वतीने स्थानिक आमदार आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या कडेही पाठपुरावा केला जाणार आहे.