बाणेर प्रतिनिधी :: पुणे शहरातील व बाणेर बालेवाडी सुस पाषाण महाळुंगे व परिसरातील नागरिकांना माफक दरात चांगली रुग्णसेवा मिळावी, या हेतूने महापालिकेने स्वत:च्या जागेवर वारजे माळवाडी आणि बाणेर येथे सुसज्ज रुग्णालये उभारण्यास खासगी एजन्सीला परवानगी दिली. मात्र हॉस्पिटल प्रशासनाकडून दिवसाढवळ्या सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होताना दिसून येत आहे,
राज्य सरकार व महापालिका प्रशासन नागरिकांच्या सुखसुविधांसाठी करोडो रुपये भाव असणाऱ्या जमिनी कवडीमोल भावाने कंपनीला देतात व त्या बदल्यात हे सेवा देतील अशी आशा असते मात्र कंपनी प्रशासन व स्थानिक महापालिका प्रशासनाला हाताशी धरून कायद्याचे तीन तेरा वाजले जातात.
मात्र, रुग्णांना कोणत्या योजनेअंतर्गत मोफत किंवा माफक दरात उपचार द्यायचे, याबाबत कोणतीच स्पष्टता नाही. त्यामुळे महापालिकेच्या जागेवर रुग्णालय, तरीही मोफत रुग्णसेवेलाच हरताळ, अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.
महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा भूखंड बाणेर येथील आयआयएमएस जेटी फाउंडेशनला देण्यात आला असून, या जागेवर रुग्णालय उभारण्यात आले आहे. या दवाखान्यात सर्वसामान्य रुग्णांना मोफत उपचार मिळतात का? याची पाहणी ‘पुढारी’च्या प्रतिनिधीने केली होती त्यानंतर प्रशासनाला जाग येत त्यांनी धर्मादाय रुग्णालयाचा बोर्ड लावला.
मोतीबिंदूची बिनटक्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी 30 ते 35 हजार, तर योजनेतील रुग्णांना तपासण्यासह 10 हजार रुपये भरावे लागतात. जर लेन्स चांगली टाकायची असेल तर जास्तीचे पैसे स्वत:च्या खिशातून द्यावे लागतात. बोपोडी येथील आयटी पार्कशेजारी असलेल्या महानगरपालिकेच्या एका मोठ्या भूखंडावर हे रुग्णालय उभारण्यात आले आहे. या ठिकाणी प्राथमिक तपासणी फी 320 रुपये आहे, तर रेटिना तपासणी आणि सुपर स्पेशालिटी फी 800 रुपये आहे.
प्रायव्हेट ओपीडी फी थेट 1200 रुपये आहे, तर बिनटाक्याच्या मोतीबिंदू शास्त्रक्रियेसाठी चार हजार ते फेको पद्धतीची मोतीबिंदूची शास्त्रक्रिया करण्यासाठी बारा हजार रुपये मोजावे लागतात तर फेम्टो लेझर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी 35 हजार रुपये मोजावे लागतात. तसा बोर्ड देखील या ठिकाणी लावण्यात आला आहे. महापालिकेच्या कर्मचार्यांना चांगली लेन्स बसवायची असेल तर त्यांना त्यानुसार पैसे मोजावे लगतात, अशी माहिती येथील कर्मचार्यांनी दिली.
या हॉस्पिटल प्रशासनाच्या संदर्भात महापालिका प्रशासन काय निर्णय घेते याकडे आता पहावे लागेल.