Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात 58 दिवसानंतर 1670 पानी आरोपपत्र दाखल

Share

मुळशी प्रतिनिधी – : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तिचा पती, सासरा, सासू, दीर, नणंदेसह एकूण अकरा आरोपींविरोधात सोमवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अलिशा बागल यांच्या न्यायालयात 1670 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले.वैष्णवीच्या आत्महत्येनंतर 58 दिवसांत हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.त्यामध्ये, 11 आरोपींविरोधात ठोस पुरावे संकलित करण्यात आल्याचा दावा बावधन पोलिसांनी केला आहे.वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली. तिचे सासरे राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) पदाधिकारी होते.

हे प्रकरण राजकीयदृष्ट्या तापल्यामुळे सर्वांचेच या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करीत ‘वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्येची होती’ असा धक्कादायक दावा करीत या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला होता.हुंडा व जमीन खरेदी करण्यासाठी सासरी होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय २४, रा. मुक्ताई गार्डनजवळ, भुकूम, मुळशी) हिने १६ मे रोजी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. वैष्णवीला मारहाण व जाच करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती शशांक राजेंद्र हगवणे (वय २७), सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे (वय ६३), सासू लता राजेंद्र हगवणे (वय ५४), नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे (वय ३१), दीर सुशील राजेंद्र हगवणे (वय २७, सर्व रा. मुक्ताई गार्डनजवळ, भुकूम),वैष्णवीच्या बाळाला बेकायदा ताब्यात ठेवून तिच्या नातेवाईकांना पिस्तुल दाखवून धमकावल्याप्रकरणी निलेश चव्हाण (वय ३५, रा. कर्वेनगर) आणि आत्महत्येच्या घटनेनंतर पसार झालेल्या राजेंद्र व सुशील हगवणेला आश्रय दिल्याप्रकरणी प्रीतम वीरकुमार पाटील (वय ४७, रा. कोनगोळी, ता. निपाणी, बेळगाव, कर्नाटक), मोहन उर्फ बंडू उत्तमराव भेगडे (वय ५९, रा. भेगडे वस्ती, वडगाव मावळ), बंडू लक्ष्मण फाटक (वय ५५, रा. भांगरवाडी, लोणावळा),अमोल विजय जाधव (वय ३५) व राहुल दशरथ जाधव (वय ४५, दोघे रा. पुसेगाव, ता. खटाव, सातारा) यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अलिशा बागल यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात प्रत्येक आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग ठोस पुराव्यांसह अधोरेखित करण्यात आला आहे, अशी माहिती बावधन ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल विभुते यांनी दिली.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *