राज्याचा नियमित अर्थसंकल्प मार्च महिन्यात मांडला गेला, आणि पुन्हा 57 हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या मागितल्या गेल्या आहेत.
मुंबई : शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव (Bhaskar jadhav) यांनी विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात थेट निधीचा मुद्दा उपस्थित करत अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यापूर्वी, शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी निधी वाटपात योग्य न्याय मिळत नसल्याची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली होती. तर, भाजप (BJP) आमदारांनी देखील थेट गृहमंत्री अमित शाहांच्या कानावर हा विषय मांडला होता. त्यामुळे, अजित पवारांकडून केवळ राष्ट्रवादीच्या आमदारांनाच निधी दिला जात असल्याचा आरोप महायुतीमधील आमदारांकडून होत असल्याचं यापूर्वीही पाहायाला मिळालं आहे. आता, भास्कर जाधव यांनी निधी वाटपाच्या मुद्द्यावरुन अजित पवारांना (Ajit pawar) लक्ष्य करत, कोणाला किती पैसे द्यायचे हे अर्थमंत्री कसा ठरवू शकतो? असा सवाल उपस्थित केला आहे.
राज्याचा नियमित अर्थसंकल्प मार्च महिन्यात मांडला गेला, आणि पुन्हा 57 हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या मागितल्या गेल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी 7 लाख 75 हजार कोटींचा अर्थसंकल्प मांडला, मात्र अजूनही 2 अधिवेशन यंदाच्या वर्षात बाकी आहेत. अशात दोनदा पुरवणी मागण्या घेऊन येतील, तुटीचा अर्थसंकल्प मांडायला लागले आहेत. एकीकडे आम्हाला निधी मिळत नाही, अजित दादा अर्थमंत्री आहेत, मला त्यांचा आदर आहे. पण, मी संगमेश्वरला ते आले असताना गुहागर येथे छत्रपतींचा पुतळा उभरण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मागितला होता. मात्र, त्यांनी साधा होकार देखील दिला नाही. मला जेवणाचे निमंत्रण होतं. पण, असंख्य इंगळ्या डसल्या, कोण जेवणार तुमचं जेवण, असे म्हणत भास्कर जाधव यांनी अर्थमंत्री अजित पवारांना थेट लक्ष्य केलं.
निधी देणार नाहीत, तो तसाही देत नाहीत
भाजपवाले अर्थ खात्याबद्दल तक्रारी करत आहेत, शिवसेनावाले तर आधीपासूनच तक्रारी करत होते, असा अर्थसंकल्प असत नसतो. राज्याच्या तिजोरीवर कर्ज होतंय, ज्याने कर्ज काढलेलं नाही त्याच्या डोक्यावर कर्ज आहे. बोलून बोलून काय कराल, निधी देणार नाही, अरे तो तसाही तुम्ही देत नाहीत, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. कोणी एकाने चालवणारं हे खातं नाही. 7 लाख 75 हजार कोटींचा अर्थसंकल्प हा 8 लाख 15 हजारांवर घेत, 1 लाख रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प सादर केला गेला आहे. सध्या, जीएसटीवर तुमचं सर्व सुरु आहे, जीएसटी नसता तर काय होईल, असा सवालही जाधव यांनी उपस्थित केला.
एखादी आपत्ती आली, पाऊस पडला, तर पैसे कुठून आले? राखीव निधीसाठी सभागृहासमोर यावं लागलं. गृह विभागावर बोलत असताना मी कृषी विभागावरही बोलतो. बाब क्रमांक 3, आशिषजी तुमच्याकडे कृषी आहे ना? आपले कृषी मंत्री आहेत कुठे? वरच्या सभागृहात काय? चाक बिक पडतंय काय? म्हणून येत नाहीत?, असा सवाल भास्कर जाधव यांनी विचारला.