Pune राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिवाळीपूर्वीच शासनाकडून भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
दोन हजार रुपये भाऊबीज भेट
राज्यात १,०८,६२७ अंगणवाडी सेविका आणि १,०५,४७० अंगणवाडी मदतनीस अशी एकूण २,१४,०९७ पदे कार्यरत आहेत. या सर्व कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रत्येकी दोन हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. यासाठी ४२ कोटी ८१ लाख ९४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
दिवाळी गोड व्हावी म्हणून निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बालकांच्या पोषणाची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची दिवाळी गोड व्हावी, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
