पुणे प्रतिनिधी :: पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी पुणे मेट्रोने (Pune Metro) एक मोठा निर्णय घेतला आहे. यात पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आता ‘वन पुणे विद्यार्थी पास कार्ड’ (KYC)’ हा पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहे.
पुणे मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून यामधील 29 स्थानके प्रवासी सेवेत दाखल झाली आहेत. पुणे मेट्रो, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील एक प्रमुख सार्वजनिक व्यवस्था बनण्याकडे वाटचाल करीत आहे. अशातच या सेवेचा आता विद्यार्थ्यांना मोठा लाभ मिळणार असून त्यांचा प्रवासाचा खर्चहि वाचणार आहे. दरम्यान, या निर्णयाचे आता विद्यार्थ्यांसह पालकांनी स्वागत केलं आहे.
……पण किमान 200 रुपयांचा टॉप-अप करणे असणार अनिवार्य
सध्या पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या हि 1 लाख 90 हजार पेक्ष्या जास्त आहे. या प्रवासी संख्येमध्ये एक मोठा वाटा विद्यार्थी समूहाचा आहे. शहरातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये लवकरच नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. त्यामुळे मेट्रोतून प्रवास करणाऱ्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांसाठी पुणे मेट्रो एक खास भेट घेऊन आली आहे. यात 25 जुलै 2025 ते 15 सप्टेंबर 2025 या कालावधीत, पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘वन पुणे विद्यार्थी पास कार्ड’ (KYC)’ पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात 118 रुपयांना (रु 100 + रु 18 – GST) मिळणारे विद्यार्थी पास कार्ड आता या कालावधीत पूर्णपणे मोफत मिळणार आहे. पण हे कार्ड घेताना सोबत किमान 200 रुपयांचा टॉप-अप करणे अनिवार्य असणार आहे. या 200 रुपयांचा कार्ड घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे 200 रुपये टॉप-अप मिळणार असून त्यामध्ये कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.