सत्ताधारी नगरसेवकांच्या भागातच डांबराचा वर्षाव, इतर भागांवर अन्याय का?
नांदेड सिटी प्रतिनिधी : सिंहगड रोडवरील नांदेड सिटी परिसरातून उत्तमनगर शिवणे येथे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला पुणे महानगरपालिकेच्या वतीने काही दिवसांपूर्वी खोदकाम करण्यात आले. त्यानंतर या रस्त्यावर नवीन डांबरीकरण होऊन नागरिकांना सुरक्षित आणि चांगला रस्ता मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, अनेक दिवस उलटूनही रस्त्याचे डांबरीकरण झाले नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन घसरण्याचे तसेच अपघात होण्याचे प्रमाण वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
नांदेड सिटी ते उत्तमनगर शिवणे परिसरात जाण्यासाठी हा रस्ता जवळचा आणि सोयीचा असल्याने दररोज अनेक नागरिक या मार्गाचा वापर करतात. मात्र, रस्त्याची दुरुस्ती रखडल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे पाप सत्ताधारी मंडळी करत आहेत का? अपघात झाल्यानंतरच महापालिका प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर उपाध्यक्ष रुपेश घुले पाटील यांनी उपस्थित केला आहे.
पुणे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची पाहणी करावी आणि त्वरित डांबरीकरण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी घुले पाटील यांनी केली आहे. अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी सत्ताधारी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या भागातच डांबर व आवश्यक साधनसामग्री उपलब्ध होते, तर विरोधी पक्षातील नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या भागातील कामांना दुय्यम वागणूक का दिली जाते, असा प्रश्न उपस्थित केला. विकासकामांमध्ये पक्षीय भेदभाव न करता सर्व भागांतील नागरिकांना समान सुविधा मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
सत्ता कायमस्वरूपी कोणाचीही नसते; मात्र नागरिकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे. त्यामुळे नांदेड सिटी मॉलजवळील शिवणेकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण तातडीने करण्यात यावे, अन्यथा नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो, असा इशारा रुपेश घुले पाटील यांनी दिला.
