शेतकऱ्यांच्या भातशेतीतून ४०० केव्ही विद्युत वाहिनीचे खोदकाम; सभापती मंदाताई बाबाजी शेळके यांनी काम बंद पाडले

कातरखडक, खांबोली, पिंपळोली व रिहे परिसरातील शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल; टाटा कंपनीची दादागिरी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

शेतकऱ्यांच्या एक इंचही जमिनीला हात लावू देणार नाही,” मंदाताई शेळके यांचा कडक इशारा

मुळशी : कातरखडक, खांबोली, पिंपळोली, रिहे व परिसरातील गावांमधून टाटा कंपनीच्या वतीने ४०० केव्ही विद्युत वाहिनीचे काम सुरू असताना थेट भातशेतीत खोदकाम करण्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हाताशी आलेले भाताचे पीक आणि त्यातच पावसाच्या कमतरतेमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे या कामामुळे नुकसान होत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक काही व्यक्तींना हाताशी धरून शेतकऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच शेतकऱ्यांना विश्वासात न घेता आणि त्यांच्या हरकतींचे निराकरण न करता रातोरात खोदकाम सुरू करण्यात आले. या खोदकामामुळे भातपिकाचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणाची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुळशी तालुका उपाध्यक्ष बाबाजी शेळके यांच्याकडे परिसरातील शेतकऱ्यांनी मांडली. त्यानंतर बाबाजी शेळके यांनी तातडीने आमदार शंकरभाऊ मांडेकर यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला.

या तक्रारीची दखल घेत आज सकाळी मुळशी पंचायत समितीच्या सभापती मंदाताई बाबाजी शेळके आणि बाबाजी शेळके यांनी शेतकऱ्यांसमवेत संबंधित ठिकाणी भेट दिली. यावेळी सुरू असलेले खोदकाम बंद पाडण्यात आले. तसेच कामासाठी आणलेली यंत्रसामग्री परत नेण्यास सांगण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण होईपर्यंत काम पुढे सुरू करू नये, अशा सूचना सभापती मंदाताई शेळके यांनी संबंधितांना दिल्या.

यावेळी सभापती मंदाताई बाबाजी शेळके यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना कडक शब्दांत इशारा देत सांगितले की, “विद्युत वाहिनीचे काम करायचे असल्यास वनविभागाच्या जमिनीतून किंवा डोंगराच्या बाजूने पर्यायी मार्गाचा विचार करावा. मात्र, शेतकऱ्यांच्या एक इंचही जमिनीला हात लावता कामा नये. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आणि त्यांच्या जमिनी व पिकांचे नुकसान टाळल्याशिवाय कोणतेही काम सुरू करू नये.”

शेतकऱ्यांच्या जमिनी आणि उभ्या पिकांचे संरक्षण होणे महत्त्वाचे असून, कोणतेही काम करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. तसेच या प्रकरणात संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशा सूचनाही देण्यात आल्या.

शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करून, त्यांच्या हरकतींचा विचार करावा आणि पर्यायी मार्ग उपलब्ध असताना शेतजमिनी व भातपिकांचे नुकसान टाळावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

15 ऑक्टोबर 2026