Pune Metro Mahacard: पुणे मेट्रोच्या ‘महाकार्ड’ला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद;

Pune प्रवाशांची तिकिटाच्या रांगेतून मुक्तता व्हावी, यासाठी महामेट्रोच्या वतीने महाकार्ड सुविधा सुरू केली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा तसेच कामानिमित्त दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा या डिजिटल महाकार्ड सुविधेस उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

विद्यार्थी, तरुणवर्ग व चाकरमान्यांनी या कार्डला पसंती दिली असून, आतापर्यंत महामेट्रोने दीड लाख डिजिटल कार्डचे वाटप केले आहे.

पुणे मेट्रोच्या महाकार्डामुळे आधुनिक सुविधेमुळे प्रवाशांचा तिकीट रांगेतील वेळ वाचून, प्रवास वेगवान, सुलभ आणि सुखद बनला आहे. आजतागायत महामेट्रोने साधारणत: संख्या १ लाख ५८ हजार ६९६ कार्डचे वितरण केले आहे. पुणे मेट्रोचे महाकार्ड खरेदी करण्यासाठी प्रवाशांना सुरक्षा अनामत रक्कम आणि कार्डमधील सुरुवातीचे रिचार्ज बॅलन्स मिळून साधारणपणे १५० ते २०० रुपयांपर्यंत प्रारंभिक खर्च येतो.

या कार्डचा वापर करणे सोपे आणि सोयिस्कर आहे. स्थानकावर प्रवेश करताना किंवा संपवून बाहेर पडताना ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन गेटवरील स्कॅनरवर हे कार्ड टॅप करावे लागते. यामुळे दररोज तिकीट काढण्यासाठी किंवा सुट्या पैशांसाठी तिकीट खिडक्यांवर रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

सर्वसामान्यांना वापरणे सोयीचे होत आहे. या स्मार्ट कार्डच्या नियमित वापरामुळे प्रवाशांचा वेळ वाचतो. महाकार्डधारकांना प्रत्येक मेट्रो प्रवासाच्या तिकिटावर दहा टक्के सवलतही मेट्रोकडून दिली जात आहे.