म्हाळुंगे-नांदे रोडवरील व्हीटीपी टाऊन स्क्वेअरजवळ शुक्रवारी (दि. २) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कर्नाटकहून माल घेऊन आलेला १६ टायरचा आरएमसी ट्रक रस्त्याच्या मध्यभागातील दुभाजकावर चढून पलटी झाला.
चालकाला डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघातस्थळी रस्त्याच्या एका बाजूला मोठा खड्डा असून, मध्यभागातील दुभाजक तुटलेल्या अवस्थेत आहे. विशेष म्हणजे, रात्री तसेच पहाटेच्या कमी प्रकाशात वाहनचालकांना दुभाजक स्पष्टपणे दिसावा, यासाठी पुरेसे रिफ्लेक्टिव्ह मार्किंग, रंगकाम किंवा सुरक्षा चिन्हे नसल्याचे दिसून येते. येथील एका बाजूला खड्डा, दुसऱ्या बाजूला तुटलेला दुभाजक आणि त्यावर रात्री दिसतील अशी प्रभावी मार्किंग नाही.
यामुळे मार्गावर अवजड वाहनांसह दुचाकी, कार तसेच स्कूल बसमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. साहजिकच या अपघातामुळे म्हाळुंगे-नांदे मार्गावरील रस्त्याची दुरवस्था आणि अपुऱ्या सुरक्षा उपायांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
