पाच वर्षांखालील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये : सभापती मंदाताई बाबाजी शेळके

मुळशी प्रतिनिधी -: पोलिओमुक्त भारताचा दर्जा कायम राखण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुळशी पंचायत समितीच्या सभापती सौ. मंदाताई बाबाजी शेळके यांनी केले आहे त्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी बोलत होत्या.

यावेळी त्यांनी हिंजवडी आरोग्य केंद्र, रिहे आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र माले, प्राथमिक आरोग्य केंद्र अंबडबेट येथे प्रत्यक्ष भेट देत लसीकरणाचा शुभारंभ केला.

सभापती मंदाताई बाबाजी शेळके यांच्या हस्ते बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

पुढे बोलताना सभापती मंदाताई बाबाजी शेळके म्हणाल्या की, भारताला पोलिओमुक्त देशाचा दर्जा मिळाला असला तरी तो कायम राखण्यासाठी जनसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. तालुक्यातील प्रत्येक पालकाने आपल्या बालकाचे लसीकरण करून घ्यावे. कोणतेही बालक या मोहिमेपासून वंचित राहणार नाही, यासाठी आरोग्य यंत्रणा आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करावे.

यावेळी सभापतींनी विविध पोलिओ लसीकरण केंद्रांना भेट देऊन आरोग्य यंत्रणेने केलेल्या नियोजनाची पाहणी केली. प्रत्येक ठिकाणी उत्तम व्यवस्था व नियोजन पाहून त्यांनी आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक करत त्यांच्या कार्याबद्दल आभार व्यक्त केले.