पुणे महापालिका टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी करणार नियमावली!

Pune News शहरात पाणीकपात सुरू असल्याने नागरिकांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. अनेक भागांत पाणीटंचाई भेडसावत असल्याने टँकरनेही पाणी दिले जाते. टँकरने केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये पारदर्शकता तसेच अधिकाधिक सुरक्षितता यावी, यासाठी मार्गदर्शक नियमावली (एसओपी) तयार करण्याचे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिले.

महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक झाली. त्यामध्ये शहरातील पाणीटंचाई, टँकरचालकांकडून पाण्यासाठी घेतले जाणारे शुल्क, खासगी टँकरचालकांकडून होणारी नागरिकांची लूट अशा विषयांवर जोरदार चर्चा झाली. ‘जादा दराने केली जाणारी पाणीविक्री, टँकर उशिरा पोहोचणे, ‘जीपीएस’ प्रणालीचा अभाव, रस्त्यांवरील अपघात, पाण्याच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारी आणि नियमनाचा अभाव अशा अनेक समस्या येत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून एकसमान आणि प्रभावी कार्यपद्धती निश्चित करणे आवश्यक आहे,’ असे भिमाले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

‘शहरातील टँकर पुरवठ्याची सद्य:स्थिती, महापालिकेचे व खासगी टँकरची संख्या, टँकर भरणा केंद्रांची क्षमता, अधिकृत दर, अपघातांची आकडेवारी, यासह चालकांची पात्रता, जीपीएस यंत्रणा, ऑनलाइन बुकिंग व्यवस्था, पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी आणि नियंत्रण कक्षाबाबत महापालिका प्रशासनाने तातडीने सविस्तर माहिती स्थायी समितीसमोर सादर करावी,’ अशा सूचना देण्यात आल्या.

टँकरद्वारे पुरविल्या जाणाऱ्या पाण्यासाठी मार्गदर्शक नियमावलीमध्ये अधिकृत दरपत्रक जाहीर करणे, प्रत्येक टँकरवर दरफलक लावणे, सर्व टँकरमध्ये जीपीएस बसविणे, नागरिकांसाठी मोबाईल ॲपद्वारे टँकर ट्रॅकिंग सुविधा उपलब्ध करणे, ऑनलाइन आणि हेल्पलाईनद्वारे पारदर्शक बुकिंग व्यवस्था सुरू करणे तसेच ‘पहिली मागणी – पहिला पुरवठा’ या तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे सांगण्यात आले.

टँकरच्या सुरक्षिततेसाठी वेगमर्यादा निश्चित करणे, शाळा व रुग्णालय परिसरात विशेष नियम लागू करणे, चालकांचे नियमित प्रशिक्षण, वैद्यकीय तपासणी, मद्यपान व अमली पदार्थ चाचणी, सुरक्षा दिवे, धोकादायक, अपघातग्रस्त स्थळांची माहिती, रिव्हर्स कॅमेरे आणि अलार्म प्रणाली अनिवार्य करण्याची सूचना करण्यात आली.

पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रत्येक टँकरमधील पाण्याची नियमित नमुना तपासणी, क्लोरिनेशन, दूषित पाणीपुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई, सर्व खासगी टँकरची नोंदणी, वार्षिक फिटनेस प्रमाणपत्र आणि नियमभंग करणाऱ्यांची यादी तयार करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला देण्यात आल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष भिमाले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.