ओमराजेंवर नाराज, भावानेच शड्डू ठोकला, म्हणाले उद्धव ठाकरेंनी फक्त आदेश द्यावा

Pune News निष्ठा म्हणजे काय, याची गोष्ट सांगताना गद्दारांनी ५० खोके घेतले, असे अत्यंत आवेशात सांगणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही विकासनिधीचे तुणतुणे वाजवून मूळ शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सेनेत प्रवेश केला.

जून २०२२ ला शिवसेनेत पहिली मोठी फूट पडली, त्यानंतर बरोबर चार वर्षांनी २२ जून २०२६ रोजी सहा खासदारांनी आपली भूमिका बदलून एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. मतदारसंघाचा विकास, त्यासाठी लागणारा निधी कमी पडत असल्याने सत्तापक्षात जात असल्याचे एकमुखाने सहा खासदारांनी सांगितले. या सगळ्यात सर्वाधिक चर्चा झाली ती धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची. कारण जिवंत असेपर्यंत उद्धव ठाकरे यांना सोडणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतली होती. तीच शपथ पायदळी तुडवून त्यांनी शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र ‘ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी असतात’, अशी मराठीत म्हण आहे. आता ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात त्यांच्याच घरातल्या व्यक्तीने शड्डू ठोकलाय! ओमराजे निंबाळकर यांचे बंधू नंदू राजे निंबाळकर यांनी ओमराजे निंबाळकर यांची साथ सोडून ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाकरे गटाचे निष्ठावंत खासदार ओमराजे निंबाळकर यांना शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात मोठा धक्का बसला असून धाराशिव शहराचे माजी नगराध्यक्ष आणि ओमराजे निंबाळकर यांचे बंधू नंदू राजे निंबाळकर हे भावाच्या भूमिकेवर नाराज झाले आहेत. ओमराजेंनी हा निर्णय का घेतला? त्यांचा निर्णय माझ्या मनाला पटत नसून मी ओमराजे निंबाळकर यांची साथ सोडत असल्याचे नंदूराजेंनी स्पष्ट केले आहे.

धाराशिव जिल्हा ठाकरे कुटुंबाचा आणि शिवसेनेच्या विचारांचा बालेकिल्ला
ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयाने नक्कीच आम्हाला मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांचाही जनसंपर्क मोठा आहे. त्याच माध्यमातून त्यांनी आतापर्यंत काम केले. परंतु धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून ठाकरे कुटुंबाला मानणारा जिल्हा आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळात शिवसेनेची संघटना बांधून बालेकिल्ला कसा शाबूद राहील, हे मी पाहीन. २०१६ साली मी शिवसेनेत प्रवेश केला. मला नगराध्यक्षपदाची उमेदवारी शिवसेनेने दिली. त्यानंतर मी पक्ष संघटनेचा खूप बारकाईने अभ्यास केला. शिवसेना हा पक्ष चळवळीतून निर्माण झालेला पक्ष आहे. लोकांची शिवसेनेकडून नेहमी अपेक्षा राहिलेली आहे की त्यांनी सरकारला, प्रशासनाला जाब विचारावा. म्हणूनच मला संघटनेबद्दल प्रेम निर्माण झाले, असे नंदूराजे निंबाळकर म्हणाले.

ओमराजेंविरोधात लढण्यासाठी तयार, भावानेच शड्डू ठोकला
ओमराजे निंबाळकर यांनी पक्ष सोडताना माझ्याशी चर्चा केली. त्यांनी काही कारणे सांगितली. परंतु ती कारणे मला न पटण्यासारखी आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात लढण्यासाठी खूप नेते आहेत. आमच्या पक्षात नेत्यांची कमी नाही. पण जर पक्षाने मला ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात लढण्याचा आदेश दिला तर मी त्यांच्याशी दोन हात करायला तयार आहे, असे म्हणत नंदूराजे निंबाळकर यांनी भावाविरोधात शड्डू ठोकला. तसेच उद्धव ठाकरे येत्या २८ तारखेला धाराशिवला दौऱ्यासाठी येत आहेत. त्यांच्या दौऱ्याची मी तयारी करीत असल्याचे नंदूराजे यांनी सांगितले.

नंदूराजे निंबाळकर कोण आहेत?
नंदूराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत
ते धाराशिवचे सहसंपर्कप्रमुख म्हणून कार्यरत आहेत
गेल्या अनेक वर्षांपासून नंदूराजे ओमराजेंबरोबर कार्यरत आहेत
धाराशिव शहराचे माजी नगराध्यक्ष देखील ते राहिलेले आहेत
धाराशिव मतदारसंघात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे