पुणे महापालिकेचे नगरसेवक हरिदास चरवड यांच्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
पुणे प्रतिनिधी – : विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेची प्रेरणा निर्माण व्हावी, ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने केदारनाथ सार्वजनिक वाचनालय व सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला इयत्ता १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला. संस्थेच्या या उपक्रमाचे यंदाचे २६ वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांतर्गत २६ गुणवंत विद्यार्थ्यांना २६ सायकली भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार भिमराव अण्णा तापकीर आणि प्रा. डॉ. सुधाकर जाधवर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे शहरासह ग्रामीण भागातील सुमारे १५०० हून अधिक विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांची विभागनिहाय निवड करून प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना सायकल प्रदान करण्यात आली. तसेच इतर गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, चषक, सन्मानचिन्हे आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. गेली सलग २६ वर्षे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम आज अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनासाठी कठोर परिश्रम, सातत्य, शिस्त आणि सकारात्मक विचारांचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त लाभ घेतला.
प्रास्ताविकात संस्थेचे संस्थापक व विद्यमान नगरसेवक हरिदास चरवड यांनी संस्थेच्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, “केवळ सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या प्रेमातून हा उपक्रम सुरू करण्यात आला. काही मित्रांनी मिळून सुरू केलेल्या या उपक्रमाला आज २६ वर्षे पूर्ण झाली असून हजारो विद्यार्थ्यांच्या यशामध्ये आमचा छोटासा वाटा आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी हा उपक्रम यापुढेही अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहील.”
यावेळी संस्थेतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘आदर्श विद्यालय सिंहगड करंडक – २०२६’ हा पुरस्कार खडकवासला येथील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंत विद्यालयास प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमास नगरसेवक तथा सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय अध्यक्ष सचिन मोरे, माजी नगरसेवक बाळासाहेब नवले, विश्वास ग्रुपचे बाळासाहेब पोकळे, नगरसेविका जयश्री भूमकर, नगरसेविका कोमल नवले, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर दळवी यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करताना त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणे, गुणवत्तेला प्रोत्साहन देणे आणि शिक्षण क्षेत्रात सकारात्मक स्पर्धा निर्माण करणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश असून, गेल्या २६ वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
