Pune News: पुणे महापालिकेचा निर्णय! १७२ सेवकांना मुकादमपदी पदोन्नती; शहरातील कचरा व्यवस्थापन होणार सक्षम

कचरा व्यवस्थापन आणि गल्लीबोळातील स्वच्छतेवर नजर ठेवण्याची जबाबदारी मुकादमांची असते. पण अनेक मुकादम सेवानिवृत्त झाल्याने केवळ ३१९ जण सध्या कार्यरत आहेत. त्याचा परिणाम स्वच्छतेवर होत आहे.

त्यामुळे आता १७२ सेवकांना मुकादम पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. यामुळे शहरात स्वच्छतेचे प्रमाण वाढण्यास हातभार लागणार आहे. अनेक वर्षांनंतर सेवकांना मुकादमपदी पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेचे प्रकल्प बंद पडणे, ओला व सुक्या कचऱ्यावर व्यवस्थित प्रक्रिया न करणे यामुळे शहरातील कचरा प्रश्‍न निर्माण होत आहे. दरम्यान, शहरात विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले होते. त्यावर टीकेची झोड उठल्यानंतर प्रशासनाने यंत्रणा कामाला लावून कचरा उचलण्याचे काम केले आहे. तरीही शहरातील प्रमुख रस्ते, गल्लीबोळ व्यवस्थित झाडले जात नाहीत.

रस्त्यावर पालापाचोळा, कागद, प्लॅस्टिक, माती, खडे यांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे शहर अस्वच्छ दिसत सून, त्यासोबत रस्ते धोकादायक झाले आहेत. महापालिकेचे झाडणकामाचे सुमारे ४० टक्के कर्मचारी कामावर हजर नसतात, तरीही त्यांच्या नावाने दर महिन्याला वेतन निघत आहे. या कर्मचाऱ्यांची हजेरी घेण्यासाठी महापालिकेने ॲप विकसित केले आहे.

त्यात मुकादमाच्या मोबाइलमध्ये चेहरा दाखविल्यानंतरच कर्मचाऱ्यांची हजेरी लागणार आहे. शिवाय दिवसातून तीन वेळा अशा पद्धतीने हजेरी घेतली जाणार आहे. त्यामुळे मुकादमासह स्वच्छता कर्मचारीही कामावर हजर असणे अनिवार्य झाले आहे.

शहरातील स्वच्छतेची जबाबदारी ही आरोग्य निरीक्षकांवरही असते, पण क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी आरोग्य निरीक्षकांवर असल्याने ते एकाच भागात लक्ष देऊ शकत नाहीत. पण मुकादम हा त्याच्या कोठीअंतर्गत येणाऱ्या चार ते पाच किलोमीटरमधील स्वच्छता, क्रोनिक स्पॉट, राडारोडा यावर लक्ष देऊ शकतो. हे काम अधिक कार्यक्षमपणे होण्यासाठी १७२ जणांना मुकादम या पदावर पदोन्नती दिली आहे.