अजित पवारांचा अपघात झाला त्या कंपनीच्या विमानात पार्थ पवार बसलेच कसे? पैसा कोणाचा? अंजली दमानियांचा सवाल!

Pune अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला होता. अपघात झालेले विमान हे VRS कंपनीच्या मालकीचे होते. अनेकांनी या अपघातावर संशय व्यक्त केला असून विमान कंपनीवरही शंका उपस्थित केला होती.

या प्रकरणी सध्या तपास सुरू आहे. अशातच आता अजित पवार यांचे सुपुत्र आणि खासदार पार्थ पवार यांनी VRS कंपनीच्या विमानातून प्रवास केल्याचे समोर आले आहे. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काय म्हणाल्या दमानिया?

पार्थ पवार यांच्या विमान प्रवासावर बोलताना अंजली दमानिया यांनी म्हटले की, ज्या VSR कंपनीच्या विमान अपघातात तीन महिन्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाला, त्याच विमानात मुलगा जातो? त्या VSR कंपनी च्या चौकशीची मागणी करायचे सोडून, त्याच विमानात पार्थ पवार निर्धास्तपणे जातो ?

सुनेत्रा पवारांचे OSD, राम चौबे आणि विकास पाटील, जे सरकारी अधिकारी आहेत आणि सरकारी पगार घेतात, ते पुन्हा एकदा पवारांच्या घरासाठी काम करत आहेत? मी पुन्हा एवढ्यासाठी म्हणत आहे कारण, हेच ते दोघे जे पुणे मुंढवा जमीन प्रकरणात पार्थच्या बाजूने उभे होते. तेव्हा अजित पवारांचे PA, आता सुनेत्रा पवारांचे. प्रश्न साधे आहेत, सरकारी अधिकारी खाजगी कामासाठी कसे जाऊ शकतात? चार्टर फ्लाइटचे पैसे कुणाच्या खिशातून? आणि VSR च्या त्याच विमानात पार्थ पवार बसले तरी कसे? उत्तरं जनतेला हवीत.

रोहित पवारांचा गंभीर आरोप

आज आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत खळबळजनक दावा केला आहे. अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते ते विमान VSR कंपनीचे आहे, ज्याचे मालक व्ही के सिंग आहेत. याबाबत बोलताना रोहित पवार यांनी म्हटले की, ‘अजित दादांचा अपघात सकाळी झाला तेव्हा व्ही के सिंगला बक्षीस म्हणून 9 कोटी 81 लाख रुपये दिले, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे अजित दादांचा अंत्यविधी सुरू होता तेव्हा 16 कोटी 88 लाख रुपये दिले. आतापर्यंत 145 कोटी सिंग ला दिले आहेत.’