Pune News दारू आरोग्यासाठी वाईट आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण अनेकजण ‘आठवड्यातून एकदा प्यायल्याने काय होतं?’ असं म्हणत स्वतःची समजूत घालतात.
पण खरंच यात काही तथ्य आहे का? चला जाणून घेऊया.डॉक्टरांच्या मते, निरोगी व्यक्तीने आठवड्यातून एकदा कमी प्रमाणात (उदा. 60 मिली) दारू प्यायल्यास मोठा धोका नसतो. पण याचा अर्थ धोका शून्य आहे, असं नाही.
एकाच वेळी जास्त प्यायल्यास शरीराला नुकसान होतंच. दोन बीअरसोबत स्नॅक्स खाल्ल्यास शरीरात १००० ते १२०० कॅलरीज जातात, ज्यामुळे वजन वाढू शकतं.
कमी वेळेत जास्त दारू पिण्याला ‘बिंज ड्रिंकिंग’ म्हणतात. हे खूप धोकादायक आहे. यामुळे लिव्हरवर अचानक ताण येतो, हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात आणि गंभीर परिस्थितीत जीवही जाऊ शकतो.
आठवड्यातून एकदाच प्यायलात, पण एकाच वेळी जास्त प्यायल्यास शरीराचं संतुलन बिघडतं.
दारू प्यायल्याने रक्तदाब (ब्लड प्रेशर) वाढू शकतो आणि हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात. दारूसोबत धूम्रपान केल्यास हृदयाच्या आजारांचा धोका आणखी वाढतो.
दारू प्यायल्यावर पटकन झोप लागल्यासारखं वाटलं, तरी ती शांत आणि गाढ नसते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी थकवा आणि चिडचिड जाणवते.
दारू प्रत्येकासाठीच धोकादायक असली तरी, काही लोकांनी तिला पूर्णपणे टाळायला हवं. यामध्ये गर्भवती महिला, लिव्हर किंवा हृदयाचे आजार असलेले रुग्ण, मानसिक आरोग्याच्या समस्या असलेले लोक, इतर औषधं घेणारे आणि पचनाच्या किंवा ॲसिडिटीच्या समस्या असलेले लोक यांचा समावेश आहे. यांच्यासाठी दारू अधिकच धोकादायक ठरू शकते.
