सिंहगड रोडची लेक थेट महापौरपदी. मंजुषा नागपुरेंच्या गळ्यात महापौरपदाची माळ!

Pune पुणे महानगरपालिकेच्या सत्ताकारणात यंदा रंगतदार पण शांत असा सत्तांतराचा अध्याय पाहायला मिळाला. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात तगडी फाईट अपेक्षित असतानाच, अखेर भाजपने बाजी मारली आणि राष्ट्रवादीने रणनीतीपूर्वक माघार घेतली.

सलग तिसऱ्यांदा नगरसेविका ठरलेल्या मंजुषा नागपुरे. सिंहगड रोड परिसरातील या लोकप्रिय नेत्या आता पुण्याच्या नव्या महापौर आहेत, तर परशुराम वाडेकर उपमहापौरपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

ही निवडणूक इतकी गाजण्याचं कारण म्हणजे ती बिनविरोध झाली. प्रभाग क्रमांक ३५ (सनसिटी-माणिकबाग) मधून मंजुषा नागपुरे आणि ३५ ड मधून श्रीकांत जगताप हे भाजपचे उमेदवार कोणताही विरोध न होता निवडून आले. विशेष म्हणजे महापौरपदासाठी राष्ट्रवादीने जाणीवपूर्वक उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला.

पडद्यामागची कथा महत्त्वाची आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर महापौर व उपमहापौर पदाची निवड बिनविरोध करण्यावर एकमत झालं होतं. अजित पवारांनी दिलेला शब्द राष्ट्रवादीने पाळला, आणि त्यामुळे पुण्यात ‘मैत्रीपूर्ण लढती’चा राजकीय प्रयोग यशस्वी झाला.

मंजुषा नागपुरेंचा प्रवासही तितकाच लक्षवेधी आहे. आयटी क्षेत्रात उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम केलेल्या नागपुरेंनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर तळागाळातील काम, सातत्य आणि पक्षनिष्ठा यामुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सिंहगड रोड परिसरात त्यांचा मजबूत जनाधार आहे.