नसबंदीच्या आरोपांनी राजकारण पेटले; अजित पवारांना उत्तर देताना लांडगेंनी काढले बारामतीचे कुत्रे

Pune महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरींनी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर आता भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

पवारांच्या टीकेला उत्तर देताना लांडगे यांची जीभ घसरली असून त्यांनी थेट वैयक्तिक पातळीवर जात बोचरी टीका केली आहे. तुमच्या बारामतीत कुत्रे चावत नाहीत का आणि तिथे नसबंदी झाली नाही का, असा सवाल करत लांडगे यांनी पवारांना त्यांच्याच भाषेत सुनावले आहे.

‘आधी डोक्यातील विचारांची नसबंदी करा’

पिंपरी चिंचवड महापालिकेतील कुत्र्यांच्या नसबंदीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अजित पवार यांनी एका जाहीर सभेत केला होता. या आरोपाचा समाचार घेताना महेश लांडगे प्रचंड संतापलेले पाहायला मिळाले. भ्रष्टाचाराचे आरोप करण्यापेक्षा तुमच्या डोक्यातल्या घिसापिट्या विचारांची नसबंदी आधी करा, अशा तिखट शब्दांत त्यांनी पवारांवर हल्ला चढवला.

ज्यांचे स्वतःचे नाव राज्यातील मोठ्या घोटाळ्यांमध्ये चर्चेत आहे आणि जमिनीच्या व्यवहारात मुलाचे नाव समोर आले आहे, अशा व्यक्तीने भ्रष्टाचारावर बोलणे हास्यास्पद असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

आरोप सिद्ध करून दाखवू का?’

आम्हाला कोणत्याही मोठ्या नेत्याला विनाकारण बदनाम करायचे नाही, म्हणूनच आम्ही आतापर्यंत शांत आहोत. मात्र जर तुम्ही आमच्यावर खोटे आरोप करत राहिलात, तर तुमच्यावरचे सर्व आरोप आम्ही सिद्ध करून दाखवू का, असा थेट इशाराच पैलवान महेश लांडगे यांनी दिला आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर दोन मोठ्या नेत्यांमधील हा कलगीतुरा आता शहरभर चर्चेचा विषय ठरत असून याचे पडसाद मतदानावर उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.