Pune News अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत एका अत्याधुनिक गांजा शेतीचा पर्दाफाश केला आहे. हिंजवडी येथील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने हायड्रोपोनिक पद्धतीने गांजाची लागवड केली जात होती.
सध्या आर्टिफिशयल इंटेलिजन्स अर्थात AIचा जमाना आहे, असं बोललं जातं. अनेक कामांमध्ये एआयचा वापर सुरू आहे. एवढचं नाहीतर एआय अनेक नोकऱ्यांवरही गदा आणणार असल्याचंही चित्र आहे.
दोन एमबीए पदवीधरांसह एकूण 4 जणांना अटक केली आहे. सुमित देदवाल आणि अक्षय मेहर अशी या सुशिक्षित आरोपींची नावे असून ते मूळचे छत्रपती संभाजीनगरचे आहेत.
आरोपींनी गांजाच्या लागवडीसाठी आवश्यक असलेला कच्चा माल डार्क वेब आणि सोशल मीडियाच्या माध्यमावरून मागवला होता. पैशांच्या व्यवहारांसाठी त्यांनी क्रिप्टोकरन्सीचा वापर केला होता जेणेकरून पोलिसांना त्यांचा पत्ता लागणार नाही. या तरुणांनी एका फ्लॅटमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसवून तिथे उच्च दर्जाचा ओजी-कुश नावाचा गांजा तयार करण्याचे युनिट उभारले होते.
तपासात पुढे मोठी माहिती हाती लागली असून छाप्यात तब्बल 2.8 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये हॅश, हायड्रोपोनिक गांजा आणि सीबीडी ऑईल यांसारख्या बंदी असलेल्या पदार्थांचा मोठा साठा सापडला आहे. सखोल चौकशी केली असता या प्रकरणाचे धागेदोरे थेट मुंबईपर्यंत पोहोचले.
मुंबईतून मालय राजेश देलिवाला आणि स्वराज भोसले या दोन पुरवठादारांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. हा सर्व माल थायलंडमधून भारतात मागवला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पुण्याच्या हिंजवडीसारख्या भागात सुशिक्षित तरुणांनी तंत्रज्ञानाचा असा चुकीचा वापर करून सुरू केलेल्या या धंद्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणातील इतर दुव्यांचा शोध घेत आहेत.
