Pune News पुणे- कोलाड महामार्गावरील भूगाव ते घोटावडे फाटा या मुळशी तालुक्यातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. भूगाव ते घोटावडे फाटा मार्गावीरल वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांचा पाठपुरावा सातत्याने सुरू झाला आहे.
पीएमपीएमएलचे विभागीय व्यवस्थापक राजेश जाधव, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता चासकर, एमएसआरडीसीच्या अंतर्गत बीएमसी कंपनीचे अभियंता सिद्धार्थ साठे, तसेच स्थानिक ग्रामस्थांकडून पिरंगुट रस्त्यांची संयुक्त पाहणी व सर्वेक्षण केले. त्यानुसार घोटावडे फाटा येथील बस थांब्यांच्या स्थलांतरांच्या जागा निश्चित केल्या. अतिक्रमणधारकांना जागा मोकळ्या करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. रिक्षावाले, तसेच खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना कडक सूचना देऊन कारवाईचा इशारा देण्यात आला. तसेच, जुन्या बस थांब्यांवर स्थलांतरांचा फलक, नव्या बसथांब्यावर बस क्रमांकाचा फलक लावणे, तसेच शेड उभारणे आदी उपाय सुरू केले.
रस्त्याची काही किरकोळ कामे पूर्ण करणे, अतिक्रमणांवर कारवाई करणे, नव्या बसस्थानकांच्या जागांची पाहणी व निश्चिती, फलक लावणे आदी कार्यवाही आज करण्यात आली.
– दत्ता चासकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, बावधन
घोटावडे फाटा येथील चौकाचे रुंदीकरण झाल्याने तेथील बस थांबे चौकालगत आले आहेत. त्यामुळे त्यांचे स्थलांतर योग्य ठिकाणी करण्याच्या जागा आज निश्चित केल्या. त्या जागेवर शेड उभारणीसाठी ग्रामपंचायतीची मदत घेणार आहोत. तेथील थांब्यासमोर चौकोन आखून नो पार्किंगचे फलक लावणार आहोत. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
– राजेश जाधव, विभागीय व्यवस्थापक, पीएमपीएमएल
