Pune News काही दिवसांपासून अवैध वाळू उत्खनन (Pune News) करणाऱ्या माफियांनी उच्छाद मांडला होता. अखेर महसूल (Maval News) विभागाने कडक कारवाई (Pune Crime) करत वनीकरणासाठी राखीव असलेल्या जमिनीतील गौण खनिज अर्थात मुरुमाचं प्रचंड प्रमाणावर बेकायदा उत्खननं करण्यात आल्याचं उघड झाल्यानं ४ तहसीलदारांसह १० जणांना निलंबित करण्यात आलं आहे..
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही कारवाई केली असून त्यामुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. (Chandrashekhar Bawankule)
मावळ तालुक्यात वाळू उपसा
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील मंगरूळ परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू आणि गौण खनिज उत्खनन सुरू असल्याचे उघडकीस आले होते. महसूल विभागाचे नियम आणि वन कायद्याचे उल्लंघन करून हे उत्खनन करण्यात येत होते. डिसेंबर 2024 मध्ये हे प्रकरण समोर आल्यानंतर याबाबत गंभीर दखल घेण्यात आली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रकरणी थेट कारवाईचे आदेश दिले होते.
तपासात धक्कादायक माहिती समोर
तपासात गट क्रमांक 36, 37, 41 आणि 42 मधील वनक्षेत्रात रॉयल्टी न भरता माती, मुरूम आणि डबर यांचे अनधिकृत उत्खनन झाल्याचे स्पष्ट झाले. अंदाजे 40 हजार ते 90 हजार ब्रास इतक्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन झाल्याचे आढळून आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या अवैध उत्खननामागे संबंधित महसूल अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि जबाबदारी टाळल्याचे समोर आले आहे.
निलंबित अधिकारी
गैरव्यवहारात कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये २ तलाठी : दीपाली सनगर आणि गजानन सोटपल्लीवार. ४ मंडळ अधिकारी : संदीप बोरकर, माणिक साबळे, अजय सोनवणे आणि रमेश कदम. ४ तहसीलदार : जोगेंद्र कटियार, मनजीत देसाई, मधुसूदन बारगे, विक्रम देशमुख. ९० हजार ब्रास जादा उत्खननासाठी संबंधितांवर गुन्हा दाखल करणे, दंड आकारणी करणे, सातबारा उताऱ्यावर नोंदी घेणे आणि दंड न भरल्यास व्याजासह वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच निलंबित अधिकाऱ्यांची तीन महिन्यांत विभागीय चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल आगामी अधिवेशनात पटलावर ठेवला जाईल, असे महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले.
