सर्वसामान्यांच्या दिलासा, आरोग्य खर्चात होणार मोठी कपात

Mumbai सर्वसामान्य कुटुंबांचा प्राथमिक आरोग्यावरील खर्च लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी ‘शिवसेना समाज सेवा कक्ष’ आणि ‘शक्ती कार्ड’ हे दोन महत्त्वाकांक्षी सामाजिक उपक्रम सुरू केले आहेत.

या माध्यमातून गरजू नागरिकांना तात्काळ, सवलतीच्या दरात वैद्यकीय चाचण्या, उपचार आणि इतर जीवनावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिची शिवसेनेकडून देण्यात आली. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

हा कक्ष स्वयंसेवी संस्था, सीएसआर निधी आणि शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधणार आहे. तसेच सेवा तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत सेवा पोहोचवेल, असे आश्वासन देण्यात आले आहे. नागरिकांच्या तातडीच्या समस्या जलदगतीने सोडवणे, पारदर्शकता आणि सन्मान राखणे हे या कक्षाचे मुख्य वैशिष्ट्य असल्याचे सांगण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे या समाज सेवा कक्षावर थेट लक्ष राहणार आहे. राज्य समन्वयक म्हणून चैतन्य रांगणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शक्ती कार्डचे प्रमुख फायदे

शक्ती कार्डधारकांना सरकारी योजनांव्यतिरिक्त खासगी स्तरावर 40 ते 50% सवलतीत MRI-CT स्कॅन, रुग्णवाहिका सेवा, मोफत नेत्र तपासणी, अल्प दरात शस्त्रक्रिया, आठवड्याला मोफत ओपीडी व रक्त तपासणी, दिव्यांग-ज्येष्ठांसाठी तातडीची मदत, महिलांसाठी स्वस्त सॅनिटरी पॅड्स, डॉक्टर ऑन-कॉल व व्हॉट्सअ‍ॅप क्लिनिक, कौशल्यविकास-रोजगार शिबिरे तसेच गरजूंसाठी स्वयंसेवी संस्थांकडून आर्थिक मदत मिळवून देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.