पुण्यात मोठा राजकीय भूकंप! भाजप – राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

Pune नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका पार पडल्या. काही प्रभागातील निवडणुका २० डिसेंबर रोजी होणार आहेत. दरम्यान, आता नेत्यांचे लक्ष नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांकडे वळले आहेत.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून, पक्षातील कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

पुण्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप, राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाची साथ सोडली आहे. त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुनील गोगले यांनीही शिवबंधन हाती बांधलं आहे.

आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानावर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुनील गोगले, भारतीय जनता पार्टी माथाडी पुणे शहराध्यक्ष अक्षय भोसले आणि मातंग एकता आंदोलनाच्या आरती मिसाळ यांनी हाती शिवबंधन बांधलं.

तसेच क्रांतीवीर झोपडपट्टी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश परदेशी आणि छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष राम घायतिडक यांनीही ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेत्यांच्या हाती शिवबंधंन बांधून त्यांचं पक्षात स्वागत केलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश ठाकरेंच्या शिवसेनेसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.