Pune
अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा शाही विवाहसोहळा बहरीनमध्ये आयोजित करण्यात आला आहे. येत्या ४ ते ७ डिसेंबर या कालावधीत हा विवाहसोहळा पार पडणार आहे. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या या शाही विवाहसोहळ्यासाठी बहरीनमध्ये जोरदार तयारी सुरु आहे.
जय पवार यांच्या विवाहसोहळ्याला संपूर्ण पवार कुटुंब अनुपस्थित राहणार असल्याचे बोललं जात आहे. जय पवार यांच्या लग्नाला अजित पवारांचे सख्खे लहान भाऊ श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी उपस्थित राहणार नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यासोबतच शरद पवार, सुप्रिया सुळे हे देखील लग्नाला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
पवार कुटुंब गैरहजर?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांचे सख्खे लहान भाऊ असलेले श्रीनिवास पवार हे जय पवार यांच्या विवाहसोहळ्यासाठी बहरीनला जाणार नाहीत. श्रीनिवास पवार आणि त्यांची पत्नी बंगळुरु येथील एका विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यामुळे ते बहरीन येथील कार्यक्रमात गैरहजर राहतील. त्यांच्यासोबतच शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे हे देखील जय पवार यांच्या लग्नाला उपस्थित नसणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. यामुळे कौटुंबिक मतभेद असल्याची चर्चा रंगली आहे. श्रीनिवास पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबाच्या गैरहजेरीमुळे पवार कुटुंबातील मतभेद चव्हाट्यावर आल्याचे बोललं जात आहे.
