वेस्ट इंडिजचा संघ मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. त्यामुळे मालिकेतील दुसरा कसोटी सामना हा भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. हा सामना गुवाहाटीत रंगणार आहे. या महत्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार शुबमन गिल दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे.
मालिकेतील पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात फलंदाजी करत असताना गिलच्या मानेला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडावं लागलं होतं. त्यानंतर तो दोन्ही डावात फलंदाजीसाठी येऊ शकला नव्हता. त्यामुळे भारतीय संघाला १० फलंदाजांसह फलंदाजी करावी लागली. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या १२४ धावा करायच्या होत्या. पण फलंदाजांच्या फ्लॉप शो मुळे भारतीय संघाचा डाव अवघ्या ९३ धावांवर आटोपला. त्यामुळे भारतीय संघ विजयापासून ३० धावा दूर राहिला.
भारतीय संघासोबत गुवाहाटीत दाखल
दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ गुवाहाटीत दाखल झाला आहे. कर्णधार गिल पहिल्या कसोटीवेळी रुग्णालयात होता. पण त्याला रविवारी डिस्चार्ज मिळाला असून, तो भारतीय संघासोबत गुवाहाटीत दाखल झाला आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार,शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी ऋषभ पंत भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. उपकर्णधारपदाची जबाबदारी कोणाकडे असणार, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.
भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा सामना
भारतीय संघासाठी हा सामना महत्वाचा आहे. कारण दक्षिण आफ्रिकेचा संघ या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. भारतीय संघाला जर मालिका बरोबरीत आणायची असेल, तर कुठल्याही परिस्थितीत हा सामना जिकंणं अतिशय महत्वाचं असणार आहे. कोलकाता कसोटीत पराभव झाल्यानंतर मंगळवारी भारतीय खेळाडूंनी ईडन गार्डन्सच्या मैदानावर सराव केला. त्यावेळी ध्रुव जुरेल, साई सुदर्शन, रवींद्र जडेजा आणि आकाशदीप हे खेळाडू सराव करताना दिसले. आता दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ पुनरागमन करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
