१३ देशांतील २०० स्पर्धकांचा सहभाग — शहराचा क्रीडा विकासाचा नवा पर्व सुरू!
पिंपरी-चिंचवड, दि. ३० ऑक्टोबर :
पिंपरी चिंचवड महापालिका, इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशन (आयएमएफ) आणि महाराष्ट्र स्पोर्ट क्लाइंबिंग असोसिएशन (एमएससीए) यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात प्रथमच आयएफएससी आशियाई किड्स क्लाइंबिंग चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पिंपळे सौदागर येथील योगा पार्कमधील अत्याधुनिक स्पोर्ट क्लाइंबिंग कॉम्प्लेक्स येथे होणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने देण्यात आली.
आयएफएससी आशियाई किड्स क्लाइंबिंग चॅम्पियनशिप २०२५ या स्पर्धेत १३ देशांतील सुमारे २०० खेळाडू सहभागी होणार असून, स्पीड क्लाइंबिंग, लीड क्लाइंबिंग आणि बोल्डरिंग या तीन थरारक प्रकारांमध्ये १३ आणि १५ वयोगटातील मुले-मुली आपले कौशल्य प्रदर्शित करतील. ही स्पर्धा प्रत्येक भिंतीवरील चढाई ही केवळ वेग आणि कौशल्याचीच नाही, तर मानसिक एकाग्रतेची आणि धैर्याची ही परीक्षा ठरणार आहे.
सर्वाधिक प्रगत क्रीडा सुविधा असणारे केंद्र
स्पर्धेचे परीक्षण आयएफएससी व आयएमएफ कडून नियुक्त आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय दर्जाचे स्पर्धाधिकारी करणार असल्यामुळे स्पर्धेतील सर्व निकष जागतिक दर्जाचे राहतील. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी मिशनच्या सहकार्याने उभारलेल्या अत्याधुनिक केंद्रात ही स्पर्धा पार पडणार असून हे केंद्र सध्या देशातील सर्वाधिक प्रगत क्रीडा सुविधांपैकी एक मानले जाते. अलीकडेच ऑक्टोबर २०२५ मध्ये पार पडलेल्या २९ व्या आयएमएफ वेस्ट झोन स्पोर्ट क्लाइंबिंग चॅम्पियनशिपने या केंद्राची गुणवत्ता आणि एमएससीएच्या स्वयंसेवकांची तयारी सिद्ध केली आहे. या अनुभवावर आधारित, आशियाई चॅम्पियनशिपचे आयोजन अधिक दर्जेदार होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आशिया खंडातील १३ देशांतील सुमारे २०० स्पर्धक सहभागी होणार असून, या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहराचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर झळकणार आहे.
या भव्य स्पर्धेचे उद्घाटन चिंचवड विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. शंकरशेठ जगताप यांच्या शुभहस्ते १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.
शहरातील पहिली “क्लाईंबिंग वॉल” — शत्रुघ्न (बापू) काटे यांची संकल्पना वास्तवात!
पर्वतारोहण आणि क्लाईंबिंग सारख्या अॅडव्हेंचर स्पोर्ट्सला प्रोत्साहन देण्यासाठी शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी ‘क्लाईंबिंग वॉल’ ही अभिनव संकल्पना मांडली होती. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि महापालिकेच्या सहकार्याने ही संकल्पना प्रत्यक्षात साकार झाली आहे.
योगा पार्क, पिंपळे सौदागर येथे उभारलेली ही भव्य क्लाईंबिंग वॉल नागरिकांसाठी नवीन अॅडव्हेंचर स्पोर्ट्स सेंटर म्हणून आकर्षण ठरत आहे.
श्री. शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले,
“पर्वतारोहण हा केवळ खेळ नाही, तर शिस्त, आत्मविश्वास आणि शारीरिक क्षमतेचे प्रतीक आहे. आपल्या शहरातील तरुणाईला जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि अनुभव मिळावा या उद्देशाने आम्ही ही संकल्पना राबवली. १३ देशांतील २०० स्पर्धक आपल्या शहरात येत आहेत, ही पिंपरी-चिंचवडसाठी अभिमानाची बाब आहे.”
📍 कार्यक्रमाचे ठिकाण: योगा पार्क, पिंपळे सौदागर, पिंपरी-चिंचवड
📅 कालावधी: १ ते ४ नोव्हेंबर २०२५
⏰ उद्घाटन: १ नोव्हेंबर, सायं. ५ वा.
ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील क्रीडा पायाभूत सुविधा आणि तरुणाईसाठी नवीन संधींचे दरवाजे उघडणार आहेत.
