Pune कोल्हापूर महापालिका निवडणुकीतील इच्छुकांचे भवितव्य अवलंबून असलेली आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला काढण्यात येणार आहे. आरक्षणाची ही लॉटरी फुटल्यानंतर उमेदवारांच्या तसेच पक्षांच्या हालचाली वेगावणार आहेत.
मतदार यादीच्या कार्यक्रमानंतर आता सोडत केव्हा होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्याप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाने आज महापालिकेतील प्रभाग आरक्षण निश्चिती व सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार ३० ऑक्टोबरपासून ४ नोव्हेंबरपर्यंत आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्याला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घ्यायची आहे. त्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणानुसार अनुसूचित जातीच्या ११, नागरिकांचा मागासप्रवर्ग यांच्या २१ जागा निश्चित केल्या जाणार आहेत.
त्यानंतर राहणाऱ्या जागांचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित केले जाणार आहे. त्यासाठी ८ नोव्हेंबरला आरक्षण सोडतीची जाहीर सूचना प्रसिद्ध करून ११ नोव्हेंबरला प्रत्यक्ष सोडत काढण्यात येणार आहे. त्याची वेळ व ठिकाण नंतर जाहीर करण्यात येणार आहे. शासकीय विश्रामगृहातील सभागृहात सोडत काढण्यात येण्याची शक्यता आहे. प्रारूप आरक्षण हरकती व सूचना मागविण्यासाठी १७ नोव्हेंबरला प्रसिद्ध करून त्यासाठी २४ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
त्यात आलेल्या हरकती व सूचनांवर विचार करून आयुक्तांनी एक डिसेंबरपर्यंत निर्णय घ्यायचे आहेत. तर आयोगाच्या मान्यतेनंतर २ डिसेंबरला अंतिम आरक्षणाचे गॅझेट प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रत्येक प्रभागातील कोणत्या जागेवर कोणाला संधी मिळाली, कोणाची संधी हुकली, पत्नी-मुलग्यासाठी कोणता प्रभाग निश्चित होणार, हे समजणार आहे. पक्षांचेही उमेदवार निश्चित करण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. यानंतरच राजकीय धुळवड खरी रंगणार आहे
