Sangli Politics : अखेर जयंत पाटील यांनी मौन सोडलं, चंद्रकांत पाटील यांचा शेलक्या शब्दात घेतला समाचार

Pune जादा कर्ज देणे व नोकरभरतीतील गैरव्यवहार यांची चौकशी होणारच, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला.

जयंत पाटील यांची बचावात्मक भूमिका – पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ‘मी अध्यक्ष नाही, संचालक नाही’ असे सांगत जयंत पाटील यांनी थेट उत्तर देणे टाळले; चंद्रकांत पाटील यांना ‘राज्यात महापूर आहे आणि ते काय करत आहेत’ अशा शब्दांत टोला.

राजकीय पातळीवरील तणाव वाढतोय – जिल्हा बँकेवर सध्या जयंत पाटील यांचा प्रभाव असून समर्थक अध्यक्ष आहेत; यापूर्वी स्थगित झालेली चौकशी पुन्हा सुरू करण्याबाबत दबाव; पाटील यांनी चौकशीसाठी उपोषणाची तयारी दर्शवली.

Sangli Jilha Bank Politics : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकरभरती घोटाळ्याची आता चौकशी होणारच, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी सांगलीतील सभेत दिला होता. याबाबत आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार जयंत पाटील यांच्या बीड दौऱ्यात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी हात वर केले. ‘मी या बँकेचा अध्यक्ष नाही, संचालक नाही’ असे सांगत त्यांनी बचावात्मक पवित्रा घेतला. ‘राज्यात काय सुरू आहे (महापूर, अतिवृष्टी) आणि चंद्रकांत पाटील यांचे काय चालले आहे’, अशा शब्दांत त्यांनी पालकमंत्री पाटील यांना टोलाही लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुढाकाराने येथे झालेल्या महाराष्ट्र संस्कृती बचाव सभेत जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि जयंत पाटील यांचे समर्थक दिलीप पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह हातवारे केले होते. आमदार सदाभाऊ खोत यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्दांत टीका केली होती. त्यावर चिडलेल्या चंद्रकांत पाटील यांनी दिलीप पाटील यांच्या जिल्हा बँक अध्यक्षतेच्या कारकिर्दीत झालेल्या नोकरभरतीची चौकशी केली जाईल, असा इशारा दिला. याच बँकेत कमी तारणावर जादा कर्ज दिले गेले, त्याचीही चौकशी होईल, आता सुटी नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला. त्याबाबत जयंत पाटील यांना पत्रकारांनी विचारल्यावर जयंत पाटील यांनी बोलणे टाळले.

सध्या बँकेवर जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे. त्यांचेच समर्थक माजी आमदार मानसिंगराव नाईक अध्यक्ष आहेत. त्यांनीच केलेल्या मागणीच्या आधारे बँकेतील काही प्रकरणाची चौकशी लागली होती. त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत चौकशीची मागणी रेटली. या चौकशीला स्थगिती मिळाली होती, ती उठवण्यात आली. मात्र, गती अत्यंत धिमी आहे. त्यात नोकर भरतीच्या गैरव्यवहाराचा मुद्दा नाही. त्यासह आता चौकशी व्हावी आणि त्यासाठी माझी उपोषणाची तयारी आहे, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी घेतली आहे.