Pune Municipal Corporation: पुणे महापालिका प्रभागरचना, निवडणूक आयोगावर नाराज अनेक हरकती दाखल

पुणे महापालिकेची प्रारूप प्रभागरचना जाहीर केल्‍यानंतर त्यावर राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही दिला आहे.

सामान्य नागरिकांकडूनही हरकती नोंदविण्यास सुरुवात झाली आहे. महापालिकेकडे आतापर्यंत १६१ हरकती नोंदविल्या आहेत. यातील १२ हरकती क्षेत्रीय कार्यालयाकडे, तर १४९ हरकती निवडणूक कार्यालयाकडे दाखल झाल्या आहेत. हरकती नोंदविण्यासाठी चार सप्टेंबरपर्यंत मुदत आहे.

पुण्यात ४१ प्रभाग आहेत. चार सदस्यांचा प्रभाग असल्याने उपनगरांमधील प्रभागांचे भौगोलिक क्षेत्रफळ मोठे आहे. त्यात अनेक गावे समाविष्ट आहेत. परंतु, प्रभागाच्या नावातून भौगोलिक सीमा स्पष्ट होत नाहीत. त्यावर अनेकांचा आक्षेप आहे. निवडणूक कार्यालयाकडे दाखल झालेल्या अनेक हरकतींमध्ये प्रभागाचे नाव बदल करण्याची मागणी केलेली आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

शहरातील अनेक प्रभागांत नदी आणि नाले ओलांडून प्रभागरचना केली आहे. नैसर्गिक हद्दी ओलांडून प्रभागरचना करू नये, असा नियम आहे. मात्र, चार सदस्यांचा प्रभाग मोठा होतो. त्यामुळे हद्दी ओलांडल्या जात आहेत. तसेच, २०१७ ला निवडणूक आयोगाने हद्दी ओलांडण्यास मान्यता दिली होती. त्याच धर्तीवर आता प्रभागरचना केल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

रहिवाशांची एकत्र तक्रार

शहरातील एका सोसायटीतील १३५ रहिवाशांनी एकत्रितपणे प्रभागरचनेवर हरकत घेतली आहे. आमचा प्रभाग बदला, अशी मागणी त्यांनी केली आहे. अशा पद्धतीने शहराच्या अनेक प्रभागांत एक सोसायटी दोन प्रभागांत विभागली गेल्याची शक्यता आहे. त्यामुळे हरकती वाढू शकतात.