पारनेर दूध संघावर ‘जनसेवा’चा झेंडा; डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली १२ जागांवर विजय

पारनेर तालुका दूध संघाच्या निवडणुकीत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाने १५ पैकी १२ जागांवर विजय मिळवत खासदार नीलेश लंके यांच्या सहकार मंडळाचा पराभव केला.

त्यांच्या मंडळाला फक्त तीन जागांवर समाधान मानावे लागले.

तालुका दूध संघाची निवडणूक माजी खासदार डॉ. विखे व खासदार लंके यांच्या गटांत झाली. दूध संघाच्या १५ जागांसाठी अवघे ८१ मतदार होते. डॉ. विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार काशिनाथ दाते व भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांनी या निवडणुकीची धुरा सांभाळली. चुरशीच्या या लढतीत विखे गटाच्या जनसेवा मंडळाने स्पष्ट बहुमत मिळविले.

जनसेवा मंडळाचे विजयी उमेदवार (कंसात मिळालेली मते) पुढीलप्रमाणे ःसविता औटी (४१), उतम भालेकर (४१), कल्याण काळे (४२), मारुती मुंगसे (४१), दत्ता पवार (४५), संदीप ठुबे (४३), दादाभाऊ वारे (४८), किसन गवळी (४५), संदीप ठुबे (४३) महिला प्रतिनिधी निर्मला भालेकर (४१), अनुसूचित जाती-जमाती भीमराव शिंदे (४६), इतर मागस प्रवर्ग युवराज पठारे (५१), भटक्या जाती व जमाती राजेंद्र पाचारणे (४४), सहकार विकास मंडळ अनिकेत पठारे (४७), संतोष गांगड (३९) व महिला प्रतिनिधी पूनम मुंगसे (४३).

दूध संघ निवडणुकीत मिळवलेला विजय हा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या विजयाची नांदी आहे. या विजयाने दूध संघाच्या भरभराटीसाठी प्रयत्न करणार आहोत. निवडून आलेल्या संचालकांमधून ज्या संचालकाचे दूध आहे, अशाच संचालकाला अध्यक्ष केले जाईल.

– राहुल शिंदे, तालुकाध्यक्ष, भाजप

गांगड, भालेकरांना लॉटरी

सर्वसाधारण मतदारसंघात संतोष गांगड व महिला मतदारसंघात निर्मला भालेकर हे दोन उमेदवार ईश्वर चिठ्ठीवर निवडून आले.