Pimpri Chinchwad Metro निगडी ते चाकण मेट्रो व्हाया वाकड; पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे

पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रोचा विस्तार होत असताना आता भक्ती-शक्ती ते थेट चाकणपर्यंत मेट्रो मार्ग नेण्यासाठी वेगाने हालचाली सुरू आहेत. या मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा अर्थात ‘डीपीआर’ महामेट्रो प्रशासनाने पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे सुपूर्त केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या सुमारे तीस लाखांहून अधिक असून हा आकडा झपाट्याने फुगत आहे. त्यामुळे नवीन मेट्रो मार्गाची गरज असल्याची मागणी विविध संघटना आणि संस्थांकडून सातत्याने केली जात आहे. अखेर, नागरिकांचा मागणी लक्षात घेता निगडी ते चाकण असा नवीन मेट्रो मार्गाचा ‘डीपीआर’ तयार करण्यात आला आहे. हे अंतर सुमारे ३५ ते ४० किलोमीटर प्रस्तावित आहे. या मार्गाद्वारे शहराचा दक्षिण भाग, तसेच भोसरीकडील भाग मेट्रोने जोडला जाणार आहे. वाकड आणि पिंपळे सौदागर हा उच्चभ्रू आणि आयटीचा परिसर मेट्रोशी ‘कनेक्ट’ होणार आहे.

येथे असतील ‘जंक्शन’

नाशिक फाटा

या नव्या मार्गामुळे नाशिक फाटा येथे मेट्रोचे एक जंक्शन होणार आहे. येथून भोसरी, चाकण, शहरातील दापोडी ते निगडी मार्ग तसेच, पुणे शहरात ये-जा करणे सुलभ होणार आहे.

निगडी

भक्ती-शक्ती समूह शिल्प मेट्रो स्टेशन येथे जंक्शन तयार होईल. तेथून रावेत, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, तसेच, भोसरी व चाकणला ये-जा करता येणार आहे.