मुळशी प्रतिनिधी :: शस्त्रसाठा बाळगून तो चालविण्याचा सराव केल्याच्या आरोपावरून अटक झालेल्या आरोपीने पौड पोलिसांवर न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी वकिलांनी देखील याबाबत दावा करत कारवाईची मागणी केली आहे.
आरोपींच्या वकिलाचा कोर्टात दावा
यात आरोपी गणेश मोहितेची पोलिस कोठडी वाढविण्याची मागणी करताना पौड पोलिसांनी अन्य सहआरोपी यांचा पत्ता शोधायचे कारण दिले. प्रत्यक्षात त्यापैकी एकाला अटकपूर्व जामीन, तर दुसरा आरोपी नोटिशीनुसार सासवड पोलिस ठाण्यात नियमितपणे हजेरी लावत आहेत. ही माहिती पौड पोलिसांनी न्यायालयापासून लपविली असल्याचा दावा बचाव पक्षाचे वकील प्रसन्नकुमार जोशी यांनी केला. दरम्यान पोलिसांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. या अर्जावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी १४ जुलैला पोलिस प्रशासनास नोटीस बजावली आहे.

मुळशी येथील जंगलात सात ते आठ पिस्तुलांचा वापर करून गोळीबाराची चाचणी घेण्यात आली होती. या आरोपाखाली ८ जुलैला गणेश मोहिते याला येरवडा कारागृहातून अटक करण्यात आली होती. दरम्यान व्हॉट्सअॅप कॉलच्या रेकॉर्डिंगच्या आधारे सदरची कारवाई करण्यात आल्याचे पौड पोलिसांनी नमूद केले होते. मात्र, संशयित आरोपी मोहितेसह अन्य काहींवर सासवड पोलिस ठाण्यात एका जमीन व्यवहाराशी संबंधित गुन्हा देखील दाखल आहे.